सीबीएसई बोर्ड : शिष्यवृत्ती परीक्षेत प्रिन्स सीबीएसई स्कूलच्या प्रेरणा, उन्नती राज्य गुणवत्ता यादीत झळकल्या
सेलू : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०२४-२५ मध्ये घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, १० जुलै रोजी जाहीर झालेल्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत शाळेच्या दोन विद्यार्थिनींनी अव्वल क्रमांक पटकावून शाळेची मान उंचावली आहे.
शाळेच्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या प्रत्येकी २४ विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. यापैकी, पाचवीची प्रेरणा बाबासाहेब काष्टे हिने राज्यात सहावा क्रमांक मिळवला, तर उन्नती विजयकुमार राठी हिने दहावा क्रमांक पटकावला. सलग दुसऱ्या वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांनी CBSE/ICSE बोर्डाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे, ही एक कौतुकास्पद बाब आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे, शाळेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला आणि प्रगती क्षीरसागर यांनी त्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे शाळेचे नाव उज्वल झाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.