जिंतुरातील ‘बाण नदी’ परिसराचा कायापालट होणार
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा पुढाकार, निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत
‘बाण नदी’ ला पडलेल्या नावातील उपहासही थांबविण्याची गरज
परभणी : जिंतूर नगर परिषद हद्दीतील निजामकालीन प्रसिद्ध बाण नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी आणि नदी घाट विकास करण्याकरीता नदी संवर्धन योजनेअंतर्गत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून “बाण” नदीचे संवर्धन करून परिसराचा कायापालट केला जाणार आहे. जिंतूर शहरातील सांडपाणी या नदीतून सद्यस्थितीत वाहत असल्याने पाण्याचे प्रदूषण होत आहे. हे प्रदूषण तसेच नदीकाठची धूप रोखण्यासाठी व नदी घाट विकास करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी नदी संवर्धन योजनेअंतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री बोर्डीकर यांनी जिंतूर नगरपरिषदेस दिले आहेत.
मार्गदर्शक तत्त्वानुसार यासाठी सुसाध्यता अहवालासह सविस्तर प्रकल्प अहवाल या क्षेत्रातील मान्यता प्राप्त तज्ज्ञ तांत्रिक संस्थेमार्फत किंवा सल्लागारांच्या मदतीने तयार करण्यात येणार आहे. तत्वत: मान्यतेसाठी पाठविल्यानंतर अहवालाच्या तांत्रिक छाननीअंती सचिवस्तरीय समितीद्वारे योजनेत समाविष्ट करावयाची कामे व उपयोगात आणाव्याचे तंत्रज्ञान यांची निश्चिती झाल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था मान्य कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल नदी कृती योजनेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे तयार करेल किंवा योजनेअंतर्गत स्थापित तांत्रिक कक्षांकडून तयार करून घेईल. सविस्तर प्रकल्प अहवालाचे प्राधिकृत संस्थेद्वारे तांत्रिक मूल्यांकन करून त्या प्रमाणपत्रासह अहवाल शासनास अंतिम मान्यतेसाठी सादर केला जाईल. यासाठी तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती जिंतूर नगरपरिषद मार्फत करण्यात आलेली आहे.
‘बाण नदी’चा उपहास थांबवावा
निजामकालीन काळापासून जिंतूर शहराजवळून वाहणारी नदी ‘बाण नदी’ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, प्रवाहीदिशेमुळे काळाच्या ओघात उपहासाने या नदीला ‘उलटी नदी’ म्हणून ओळख दिली गेली. सरकारदप्तरीसुद्धा ती आजही ‘उलटी नदी’ आहे. मागील अनेक वर्षापासून या नदीच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत गेले. परंतु पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या निर्णयाबद्दल पालकमंत्री यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. सोबतच या नदीला पडलेल्या नावातील उपहास थांबवाविण्याची आणि सरकारदप्तरीदेखील ‘बाण नदी’ म्हणून पुन्हा ओळख निर्माण करण्याची गरज जिंतूर शहरातील नागरिक व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.