सेलूतील नालारोडवरील घरात घुसले पाणी

सेलूतील नालारोडवरील घरात घुसले पाणी

नालेसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने पालिका प्रशासनाबद्दल नागरिकांतून संताप

सेलू : बुधवारी रात्री सेलू महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. शहरातही जोरदार पाऊस झाला. यापावसामुळे नालारोडला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पहाटे पाच वाजतादेखील या रोडवरून पूरासारखे पाणी वाहात होते. शेजारील घरांमध्ये मोठ्याप्रमाणावर पुराचे पाणी घुसले होते. यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. त्यांना रात्र जागून काढावी लागली.

सेलू शहरातून वाहणारा नाला सातत्याने कचऱ्याच्या विळख्यात असतो. पावसाळ्यापूर्वी या नाल्याची सफाई करणे ,कचरा उचलून टाकणे, सुरूअसलेल्या बांधकामांची रेती, खडी बाजूला करण्याचे संबंधित नागरिकांना सांगणे अपेक्षित होते. मात्र नगरपालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच पावसाळ्यापूर्वीचे काम मार्गी लावली नाहीत. यामुळे बुधवारी रात्रीपासून गुरूवारी सकाळीही पावसात नाला रोड परिसरातील नागरिकांच्या घरात पहाटे ४ वाजता घाण पाणी शिरले आणि नागरिकांची झोप उडाली. पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे संकट ओढवल्याने या भागातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

या नालारोडला लागून मारवाडी गल्ली, अरब गल्ली, शनिमंदिररोड, सूरज मोहल्ला, राजमोहल्ला आदी वसाहती येतात. हा नाला समोर निमूळता होत गेल्याने पुराचे पाणी परत शहराच्या दिशेने घुसून नागरिकांचा हाल होतात. दरम्यान, खंडोबा मंदिराजवळील नाल्याला बुधवारी रात्री पूर आल्याने रहेमाननगर, छत्रपती शिवाजीनगर भागात मध्ये मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. शहरातील अन्य वसाहतीतील सखल भागाला तळ्याचे स्वरूप आले होते. तर नालारोडचे पाणी वीरशैव स्मशानभूमीतही मोठ्या प्रमाणात पाणी घुसले असून तिथे अंत्यसंस्कार करणे आता जिकिरीचे झाले आहे.

तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी मे महिन्यात नागरिकांसाठी ऑनलाईन ‘जन संवाद’ कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी सेलूतील एक नागरिक म्हणून सहभागी झालो होतो. त्यांना पावसाळ्या पूर्वीची कामे आणि इतर प्रश्न मांडले होते. सेल पालिका प्रशासनाला या संदर्भात आयुक्तांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई करण्याचे आदेशित केले होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नालारोडवरील नागरिकांना याचा फटका बसला असून पुरासारख्यापाण्यामुळे मोठे हाल झाले आहेत. आता तरी पालिका प्रशासन जागे होणार आहे का ? – अभिजित राजूरकर, अध्यक्ष मोरया प्रतिष्ठान, सेलू जि.परभणी

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!