संमेलनाध्यक्षपदी कल्याणी आडे; भक्ती घांडगे स्वागताध्यक्ष
परभणीत २३ जुलैला दुसरे ‘अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलन’
परभणी : बालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती रुजावी आणि बालवाचकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्रा’ने परभणी येथे दुसऱ्या ‘अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलना’चे आयोजन केले आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे, कल्याणी कृष्णा आडे (जि.प.शाळा पार्डी, ता.सेलू) या विद्यार्थिनीची संमेलनाध्यक्ष, तर भक्ती भगवान घांडगे (जि.प.शाळा पाथरगव्हाण, ता. पाथरी) हिची स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे. दरवर्षी उत्कृष्ट बालवाचकांना हा बहुमान दिला जातो.
परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालय परिसरात आदर्श शिक्षक बजरंग गिल्डा बालसाहित्य नगरीत बुधवार, २३ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत हे संमेलन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन जिप मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या हस्ते होईल. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव हे मार्गदर्शन करतील. समारोपप्रसंगी सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील पोलास उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात ‘मी वाचनाने घडत आहे’, कथाकथन आणि ‘मी वाचलेले पुस्तक’ या विषयांवर आदर्श शिक्षक सुभाष चिंचाने सभागृहात गटचर्चा आयोजित केली आहे. तसेच, आदर्श शिक्षक प्रकाश मोहकरे वाचनपीठावर बालनाटिका आणि बालकवी संमेलन होईल. संमेलनात जास्तीत जास्त बालवाचकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे, राजेश चव्हाण, कैलास सुरवसे, संतोष रत्नपारखे, इंदुमती कदम, सुशीला नवले, पंडित दाभाडे, मयुरी जोशी, अनंता कदम, युवराज माने, नरहरी मुटकुळे, राजेंद्र शिंदे, रत्नमाला शेळके, प्रकाश रापिल्लेवार, दिपाली भावसार, अमित जाधव, विठ्ठल अनमुलवाड, महेश पुरी, प्रकाश डुबे, रविकांत झटे, नामदेव घुले आणि मनीषा जोशी यांनी केले आहे.