पशुरोग निदान, उपचार व लसीकरण शिबिराचे उद्घाटन
पालकमंत्री मेघना बोर्डीकर पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
परभणी : टाकळगव्हाण येथील पशुवैद्यकीय दवाखाना, पिंगळी आणि ग्रामपंचायत कार्यालय, टाकळगव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पशुरोग निदान, उपचार व लसीकरण शिबिराचे उद्घाटन टाकळगव्हाण येथे २४ जुलै रोजी पालकमंत्री मेधना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. दुग्धव्यवसाय हा शेतीला खूप चांगला जोडधंदा असून, सर्व पशुपालकांनी शाश्वत उत्पन्नासाठी दुग्धव्यवसायाची कास धरावी, तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. शाहीद देशमुख, सरपंच अलका पीतांबरे, उपसरपंच मंचकराव वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक उषा उमरीकर, तलाठी श्री. फलफले, ग्रामसेवक श्री. शिंदे, शिक्षक डॉ. दयानंद जाधव, प्रकाश टाकळे, मधुकर आवरगंड, मुजांजी देशमाने यांची उपस्थिती होती.शिबिराच्या माध्यमातून सर्व पशुपालकांनी आपल्या पशुंचे उपचार व लसीकरण करून घ्यावे, तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा पशुपालकांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. शिबिरामध्ये जनावरांची गर्भधारणा तपासणी, वंध्यत्व निवारण, आजारी पशुंवर उपचार व लसीकरण इत्यादी पशुसेवा देण्यात आल्या. पशुपालकांना विविध शासकीय योजनांची माहिती या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आली. पशुधन विकास अधिकारी डॉ. शाहेद देशमुख यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित पशुपालकांना दिली. या शिबिरामध्ये २४ जनावरांची गर्भधारणा तपासणी, १७ आजारी पशुंवर उपचार, आणि २७९ गायवर्गीय पशुंना लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील खुल्या जिमचे भूमिपूजन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. तसेच, शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. शाहीद देशमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, नागरिकांची मोठी उपस्थिती होती.