शाळा इमारतींची तत्काळ दुरुस्ती करा
परभणी जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कपूर यांचे निर्देश, विविध विकासकामांचा घेतला आढावा
परभणी : जिल्ह्याच्या पालक सचिवांनी परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा इमारतींची तातडीने तपासणी (ऑडिट) करून नादुरुस्त इमारतींची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालक सचिव दीपक कपूर यांनी दिले आहेत. या संदर्भातील अहवाल त्वरित मुख्यालयात सादर करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात २८ जुलैरोजी आयोजित जिल्हा वार्षिक योजनेसह विविध महत्त्वाच्या योजनांच्या आढावा बैठकीत श्री.कपूर बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अरुण नाईक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप, अधीक्षक अभियंता समाधान सबीनवार, इलियास चिश्ती आदी उपस्थित होते.
शाळा इमारतींच्या सुरक्षिततेवर भर
राजस्थानमधील शाळा इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, पालक सचिव दीपक कपूर यांनी जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील शाळा इमारतींची सद्यस्थिती तपासण्याचे, दुरुस्त करण्यायोग्य इमारतींची डागडुजी करण्याचे आणि जीर्ण झालेल्या इमारती पाडून नव्याने बांधकाम करण्याबाबतचे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले. शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा जीव अनमोल असून, त्याची किंमत करता येणार नाही, असे सांगत त्यांनी तातडीने इमारतींची तपासणी करून अहवाल पाठवण्यास सांगितले. अत्यावश्यक असलेल्या शाळा इमारत बांधकामांसाठी आकस्मिक निधी उभारून शाळा खोल्या बांधण्याच्या सूचनाही पालक सचिवांनी संबंधित विभागाला दिल्या.
१. अनुकंपा पदभरती सप्टेंबरमध्ये पूर्ण करा
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत अनुकंपा भरतीबाबत शासन आग्रही आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अनुकंपा भरती प्रक्रिया तातडीने राबवून येत्या सप्टेंबरपर्यंत नियुक्तीपत्रे देण्याचे आदेश पालक सचिव दीपक कपूर यांनी दिले.
२. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० चे काम तत्काळ पूर्ण करा
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेतील कामांना वर्षभरापूर्वी कार्यारंभ आदेश देऊनही केवळ १५ कामे सुरू असल्याने पालक सचिवांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही कामे सुरू न केलेल्या कंत्राटदारांवर दंड वसुली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. ही दंड प्रक्रिया प्रभावीपणे राबवली न गेल्यास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी वारंवार बैठका घेऊन आढावा घेण्याच्या सूचना दिल्या.
३. जलसंधारणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन १० ऑगस्टपर्यंत करा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी फळझाडे योजनेबाबत दाखवलेली तत्परता इतर कामांमध्ये दाखवली असती, तर जिल्ह्यातील कृषी विभागाचे चित्र सकारात्मक दिसले असते, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत, मृद व जलसंधारण विभागाच्या १८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन येत्या १० ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न केल्यास पुढील कार्यवाही करणार असल्याचे पालक सचिव दीपक कपूर यांनी सांगितले.
४. खासगी स्लीपर बसेसची तपासणी करा
उपप्रादेशिक परिवहन विभागाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीवर समाधान व्यक्त करत, जिल्ह्यातील खासगी स्लीपर बसेसची तपासणी करण्याच्या सूचना अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव श्री. कपूर यांनी दिल्या.
५. सणासुदीत अन्न व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी वाढवा
आता सणासुदीचे दिवस येत असल्याने, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी वाढवावी. मानवी आरोग्यास घातक असलेले बनावट पनीर बाजारात येऊ शकते, त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवून नमुने प्रयोगशाळेत पाठवावे आणि दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही पालक सचिवांनी दिले.
६. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अंगणवाड्यांची निर्मिती करा
नागपूरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – AI) वापर करून उभारण्यात आलेल्या अंगणवाडीचे उदाहरण देत, परभणी जिल्ह्यातही अशाच प्रकारच्या पथदर्शी प्रयोगातून AI चा वापर करून अंगणवाड्यांची निर्मिती करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यासाठी आवश्यक निधी विविध उद्योजक अथवा कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून (CSR) उभारण्याबाबत सूचित करण्यात आले. जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त पुरुष लाभार्थी नसल्याची पडताळणी करण्याचे आदेशही यावेळी विभागाला देण्यात आले.
प्रशासकीय कामकाजाचा आढावा
शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रगती करण्याचे निर्देश सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले. तसेच, डॅशबोर्डची माहिती १५ ऑगस्टपर्यंत अद्ययावत करण्याबाबतचे आदेशही दिले. सुरुवातीला मागील बैठकीचा अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. या बैठकीत पालक सचिव दीपक कपूर यांनी सर्व विभागप्रमुखांचा विविध शासकीय योजनांच्या अनुषंगाने विभागनिहाय आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. २ च्या श्रीमती प्रिया लांजेकर यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले, तर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी आभार मानले.