
घरांवरील टीनपत्रे उडाली, झाडे उन्मळली, विजेचे खांब पडले.
शिवशंकर निरगुडे, हिंगोली
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गावांना मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. घरांवरील पत्रे उडाले आणि केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा व गिरगाव परिसराला सुमारे 10 ते 12 गावांना वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी दुपारी जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, घरावरील पत्रे उडून गेल्याने गावकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. केळीच्या पिकाचा हाती आलेला घास वादळी वाऱ्याने हिरावून घेतल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
कुरुंदा, गिरगाव शिवारातील प्रमुख पिक असलेल्या केळीच्या बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हजारो रुपये खर्च करून पोटच्या लेकरावाणी केळी पिकांना लहानाचे मोठे केले आणि आणि या सुसाट वादळी वाऱ्याने क्षणातच सर्व केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. हजारो रुपये खर्च करून या बागासोबत शेतकऱ्यांचे स्वप्ने सुध्दा उध्वस्त झाली आहेत. मागील दोन वर्षाचे नुकसान या वर्षी तरी भरून निघेल अशी आशा होती; मात्र वादळी वाऱ्याने सर्व अपेक्षांवर पाणी फेरले आहे.
घरांवरील टीनपत्रे उडाली, झाडे उन्मळली, विजेचे खांब पडले.

कुरुंदा व परिसरात दुपारी साडेचार वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात रस्त्यालगत असलेली मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच विद्युत खांब पडल्याने या परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाल्याने गावकऱ्यांना जीव मुठीत धरून घरात थांबावे लागले. तसेच अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यासह धान्य भिजून नुकसान झाले.
कुरुंदा परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या केळीचे घड काढणीच्या अवस्थेत आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे या परिसरात हाती आलेले केळीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. केळीची झाडे, घड जमिनीवर आडवे पडल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री सात वाजता पाऊस थांबल्यानंतर घरावरील उडालेली टिनपत्रे गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची मोठी धावपळ झाली. झाडे उन्मळून पडली. तर घरावरील पत्रे उडाली. आम्ही मरण जवळून पाहिलं, अशी भावना या तडाख्यातून वाचलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.