चित्तथरारक कसरतींनी बच्चेकंपनी खूश
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या रविवारी (१२ जून) आयोजित स्पॉट परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने विद्याविहार संकुल परिसरात एरो मॉडेलिंग शो झाला. रेडिओ कंट्रोल विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिके, कसरतींनी बच्चेकंपनी खूश झाली.
या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, डॉ.आदित्य रोडगे, महादेव साबळे व प्रिन्स सीबीएसई इंग्लिश स्कूलच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी साडे दहा ते सव्वा बारा या वेळेत परिसरातील पहिली ते दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी श्रीराम प्रतिष्ठान आऊटस्टँडिंग टँलेंट (SPOT) परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रेडिओ कंट्रोल विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिके, कसरतींचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यशस्वितांना प्रिन्स सीबीएसई इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशाची संधी; तसेच गुणवत्तेनुसार शैक्षणिक व वसतिगृह शुल्कामध्ये सवलत दिली जाणार असल्याचे डॉ.रोडगे यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांपासून ही परीक्षा घेतली जाते; परंतु करोनानंतर या वर्षी झालेल्या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २३७ विद्यार्थी सहभागी झाले होते, असे डॉ.रोडगे म्हणाले. करोनामध्ये अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. कित्येकांचे रोजगार गेले. जवळच्या माणसावर करोनाने घाला घातला. शैक्षणिक नुकसानही मोठे झाले. ही जाणीव ठेवून, प्रिन्स सीबीएसई इंग्लिश स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येकाला प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असेही डॉ.रोडगे यांनी या वेळी स्पष्ट केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार (पर्सेंटाइलप्रमाणे) शैक्षणिक व प्रवेश शुल्कामध्ये सवलत दिली जाईल. याखेरीज सहभागी अन्य सर्व विद्यार्थ्यांनाही याच धर्तीवर काही प्रमाणात शुल्कामध्ये निश्चित सवलत देण्याचा प्रयत्न राहील, असे डॉ.संजय रोडगे यांनी या वेळी सांगितले.