परभणी : सेलू शहरातील पाथरी रोडवरील प्रसाद कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयात चोरट्यांनी धुडगूस घालून नुकसान केले आहे. शुक्रवारी, सतरा जून रोजी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
घटनेसंदर्भात प्रभुदयाल मंत्री यांनी शुक्रवारी सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रात्री दोन ते तीनच्या सुमारास ऑफिसचे दार व कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी नासधूस केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आठ दिवसांपूर्वीही असाच प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, तेव्हा त्यांना दरवाजा उघडता आला नाही. कुलूप खराब करून चोरटे निघून गेले. पण रात्री तिघांनी दार तोडून प्रवेश केला. मोठे नुकसान केले. यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरटे ओळखून कारवाई करावी; तसेच पाथरीरोडवरील रात्रीची पोलिस गस्त नियमित करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.