हिंगोली : अग्निपथ योजनेविरोधात सेनगाव येथील तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा काढत २० जूनरोजी आंदोलन करण्यात आले. ठेकेदारीपध्दतीने सैन्य भरती करणाऱ्या आणि भारतीय लष्कराची सुबद्ध व्यवस्था नष्ट करणाऱ्या अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध असून, कृषी कायद्याप्रमाणे ही योजना रद्द करावी.
देशभक्तीची खोटी झालर पांघरूण देशाची अस्मिता असणारी लष्करी यंत्रणा धोक्यात आणण्याचे काम या भाजपने केले आहे. सर्वसामान्य, शेतकरी, गरीब कुटुंबातील तरुण देशाच्या सेवेसाठी दाखल होतात आणि देशसेवा करतात.ती देशसेवा करण्याची संधी सैनिक म्हणूनच तरुणांना द्यावी. त्याला ठेकेदारीचे स्वरूप देऊन युवकांचा अपमान करू नये. युवकांना ठेकेदारी पध्दतीने सैन्यात भरती करून घेण्याचा निर्णय भाजपला मागे घ्यावाच लागेल. कारण या देशातील सच्चा देशभक्त आता जागा झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील, तालुकाध्यक्ष रवि गडदे महिला जिल्हाध्यक्ष प्रियंका भगत देविदास गडदे , सत्यम देशमुख, राजू गिते , कुंदरगे, राजू वाणी, लक्ष्मण गिते आदींसह तरुण मोठया संख्येने उपस्थित होते. ( वार्ताहर : शिवशंकर निरगुडे, हिंगोली )