सेलू : ‘ज्ञानोबा तुकाराम , पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ‘ चा गजर, बालवारकर्यांनी टाळ, मृदंग, वीणा चिपळ्यांच्या साथीने सादर केलेल्या पावल्या, भजन, गवळण, भारुडाने अवघी सेलूनगरी दुमदुमली. दरम्यान, वरुण राजाने अधूनमधून बरसत चांगलीच हजेरी लावल्याने वातावरण आनंदाने गर्जून गेले होते.
दोन वर्षाच्या खंडानंतर आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरातील विविध शाळांनी उत्साहात दिंडीचे आयोजन केले होते. श्री विठ्ठल – रुक्मिणी, संतांच्या वेशभूषा, वारकरी पेहराव, ढोलताशे, लेझीम पथकांनी वातावरणात चैतन्य फुलविले होते. विविध पक्ष, मित्रमंडळ, सामाजिक व सेवाभावी संस्थांनी ठिकठिकाणी दिंडीचे उत्साहात स्वागत केले. फराळ, पाण्याची व्यवस्था केली. श्रीसंत गोविंद बाबा व विनोद बोराडे मित्रमंडळाच्या शालेय दिंडी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शालेय विद्यार्थी, शिक्षक, विविध पक्ष, सामाजिक संस्था, मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, भाविक मोठ्या संख्येने आषाढी उत्सवामध्ये सहभागी झाले होते.
श्रीविठ्ठल मंदिर परिसरात जल्लोषात स्वागत
पारीख कॉलनीतील विठ्ठल मंदिर परिसरात शालेय दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, रामराव लाडाणे, चंद्रशेखर मुळावेकर यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विठ्ठल मूर्ती देऊन स्वागत केले. बालवारकर्यांना फराळ व पाणी वाटप करण्यात आले. विनोद तरटे, इम्त्याज अलीखान, सचिन राऊत, सतीश भोसले, संदीप आडळकर,प्रदीप पवार,नृसिंह हरणे, गजानन ताठे, गजानन शिंदे, आकाश अस्वले, नीलेश चेचेडीया, अक्षय भंडारी, किशोर जवळेकर, रमेश अस्वले, माणिकराव डख, शामराव गोरे, प्रताप मगर, गजानन झुटे आदींची उपस्थिती होती.