परभणी : सेलू ( जि.परभणी) येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (१७ जुलै) उत्साहात पार पडली. या वेळी बोलतांना बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर म्हणाले, ” बँकेच्या उत्कर्षाच्या वाटचालीमध्ये सभासद आणि ग्राहकांचे योगदान मोठे आहे. आगामी काळातही हे विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यासाठी निश्चितच बँक कटिबद्ध आहे.”
सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात ही सभा झाली. साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने सभेला सुरुवात झाली. संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर अध्यक्षस्थानी होते. या वेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक पवन आडळकर, डी.व्ही मुळे, डॉ.विजेंद्र नागोरी, श्रीपाद कुलकर्णी, विलास पौळ, जयराम तांगडे महाराज, डी.के.माकोडेगुरुजी, भगवानराव गजमल, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे आदींची उपस्थिती होती.
हेमंतराव आडळकर म्हणाले, ” करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन अर्थचक्र संकटात असतांना, नागरी सहकारी बँकादेखील अनेक आव्हानांना तोंड देत होत्या. अशा परिस्थितीतसुद्धा 2021-22 या आर्थिक वर्षात उत्तम बँकिंग सेवा देत, साईबाबा बँकेने आजवरचा सर्वाधिक 185.09 लाख रुपयांचा नफा कमविला असून, 31 मार्च 2022 अखेर बँकेच्या एकूण ठेवी 19197.44 लाख रूपये, कर्ज वाटप 10543.69 लाख रुपये, सभासद 7386 आहे. स्वनिधी 1646.49 लाख, अधिकृत भाग भांडवल 500 लक्ष, एनपीए 1.49% ऑडिट वर्ग-अ, शाखा सात असून एकूण कर्मचारी संख्या 62 आहे.”
गेल्या सव्वीस वर्षांपासून लाभांश देणारी व आपली बँक म्हणून साईबाबा बँकेने परभणी जिल्हाभर ओळख निर्माण केली आहे. बँकेचे सभासद व ग्राहकांमुळेच हे शक्य झाले आहे. याचे फलित म्हणून सलग सातव्यांदा बँको पुरस्काराने बँक सन्मानित झाली आहे. सभासदांना दहा टक्क्याप्रमाणे लाभांश जाहीर करण्यात आला. त्यास सभेमध्ये मान्यता मिळाली. लवकरच लाभांश वितरित करण्यात येईल, असेही आडळकर यांनी सांगितले. डी.व्ही.मुळे, रहीमखान पठाण, जयराम तांगडे यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. शुभेच्छा दिल्या. अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल अनेक सभासदांनी बँक प्रशासन व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांनी केले. अहवाल वाचन संचालक चंद्रमोगोलेशवर नागुल यांनी केले.सूत्रसंचालन व्यवस्थापक निसारखाँ पठाण यांनी केले. आभार संतोष हुगे यांनी मानले. सभेसाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या वेळी संचालक कन्हैयालाल बालचंदानी, राजेंद्र आडळकर, गणेशलाल श्रीवास्तव बालकिशन सूर्यवंशी, शेख इम्रान, प्रवीण बिनायके, ॲड.भगवानराव शिरसाठ आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईबाबा बँकेचे सेलू, बोरी व जिंतूर येथे एटीएम कार्यरत असून लवकरच परभणी शहर व वालूर येथेही एटीएम कार्यान्वित होणार आहे. डिजीटल बँकींग सेवा, पीओएस, इकॉम, सिटीएस क्लियरिंग, इसिएस क्लियरिंग, नेफ्ट, आरटीजीएस, स्वाईप मशीन,फोनपे, गुगलपे, क्यूआरकोड, मोबाईल बँकींग, यूपीआय सेवा कार्यरत आहे. अशी माहिती या वेळी देण्यात आली.