परभणीत आज ओबीसींचा ‘एल्गार’

परभणी : ओबीसी आरक्षण कायम ठेवा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, ओबीसी आरक्षण जाहीर होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला, मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू करा आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (१८ जुलै) ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील सकल ओबीसी बांधवाचा मोर्चा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. 

यानिमित्ताने तळागाळातील ओबीसी बांधवांसह विविध स्तरातील ओबींसी बांधवांना एकत्र आणण्यासाठी गाव, शहर, तालुका पातळीवरील विविध पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोर्चेबांधणी केली असून, मोठ्या संख्येने बांधव मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत.

परभणी येथील शनिवार बाजारपासून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. ऊठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, अभी नही तो कभी नहीं अशा घोषणांनी परिसर दणाणून जाणार असल्याचे सांगितले जात आहे. हक्काच्या आरक्षण लढाईत सर्वस्तरातील ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे. आज आरक्षणापासून वंचित राहून निवडणुका लढवाव्या लागत आहेत. भविष्यात सामाजिक व शैक्षणिक आरक्षणापासून सुद्धा वंचित राहून संकटांचा सामना करून ओबीसींना अस्तित्व निर्माण करण्याची गरज निर्माण होऊ शकते. याची जाणीव ठेवून तन, मन, धनाने जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांनी परभणी येथील मोर्चामध्ये सक्रीय सहभागी होण्याची हाक ओबीसी नेते, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

परभणी शहर तालुक्यासह सेलू, जिंतूर, पाथरी, मानवत, पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ तालुक्यातील जास्तीत जास्त बंधू भगिनींनी सहभाग नोंदवावा, यासाठी मोर्चेबांधणी करीत, विविध सोशल मिडियातून सहभागाबाबत आवाहन करण्यात आले आहे.

सेलू येथील रायगड कॉर्नर येथून सकाळी सव्वा नऊ वाजता मोठ्या संख्येने ओबीसी बांधव परभणीकडे रवाना होणार आहेत; तसेच जिंतूर, पूर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत येथून देखील मोठ्या संख्येने समाज बांधव मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!