सेलू : दहा आणि वीस रुपयाची नाणी ही रिझर्व बँकेने जारी केलेले कायदेशीर टेंडर आहे आणि ते स्वीकारण्यास नकार देणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. दहा व वीस रुपयाची नाणी चलनात असून नागरिकांनी व दुकानदारांनी ते घ्यावेत, असे स्पष्ट आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेलू शाखेतर्फे करण्यात आले आहे. नाणी न स्वीकारल्यास कारवाईचा इशाराही बँकेने दिला आहे.
सेलू शहरासह तालुक्यात दहा आणि वीस रुपयाची नाणे स्वीकारण्यास सर्वत्र नकार मिळत असून हा राजमुद्रेचा अवमान आहे. ही नाणी चलनात आणण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी सेलू येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने सर्व राष्ट्रीयकृत, नागरी व सहकारी बँकांना निवेदन देऊन करण्यात आली होती. या मागणीच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेलू शाखेचे मुख्य व्यवस्थापक अनंत घावडे यांनी मागणीची गांभीर्याने दखल घेतली. मंगळवारी (१९ जुलै) बँकेच्यासमोर पाच, दहा व वीस रूपयांची नाणी अधिकृत चलनात असून नागरीकांनी व व्यावसायिकांनी ते घ्यावेत, अशा आशयाचा आवाहन फलक लावला. या वेळी व्यवस्थापक अनंत घावडे, रोखपाल सुधीर मर्चंडे, ग्राहक पंचायतचे प्रांत अध्यक्ष डाॅ.विलास मोरे, तालुकाध्यक्ष सतीश जाधव, गंगाधर कान्हेकर, सुनील गायकवाड, मंजुषा कुलकर्णी, सिद्धार्थ गायकवाड, दिपक बनसोडे, आशोक कोपुलवार, उद्योजक संजय लोया, महेश मेहता, पत्रकार गणेश काटकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, शहरातील सर्वच बँका अशा प्रकारचे फलक लावणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
शहरात दहा आणि वीस रूपयांची नाणी बंद झाली असल्याचा चुकीचा व खोटा प्रचार काही मंडळीनी केला होता. ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करून ही नाणी बंद नसून, ती चलनात आहेत हे सिद्ध केले. ही नाणी नागरिक, व्यापार्यांनी स्वीकारण्याबाबत बँक प्रशासनाने रितसर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली होती. स्टेट बँकेने नाणी स्वीकारण्याचे नागरिकांना आवाहन केले. त्यामुळे दहा व वीस रूपयांच्या नाण्यांबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.
– अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सेलू