परभणी : सेलू तालुक्यातील शिवसेना व युवासेना संपूर्ण ताकदीनिशी शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठिशीच खंबीरपणे राहणार असल्याचा निर्धार तालुक्यातील शिवसैनिक व युवासैनिकांनी शंभर रुपयांच्या शपथपत्राद्वारे व्यक्त केला आहे. दरम्यान, दोन कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून प्रतिज्ञापत्र लिहून निष्ठा व्यक्त केली आहे.
शिवसेना व युवासेनेचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एक व्यापक बैठक बुधवारी (२० जुलै) शासकीय विश्रामगृहात पार पडली. ज्या शिवसेनेने आपल्याला मोठे केले, त्या शिवसेनेच्या आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. शिवसेनेचे सेलू- जिंतूर विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य व गटनेते राम खराबे, उपजिल्हाप्रमुख तथा बाजार समितीचे मुख्यप्रशासक रणजित गजमल, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगल कथले, तालुकाप्रमुख रमेश डख, रामेश्वर बहिरट, जिजाभाऊ सोळंके, शेषेराव वाघमोडे, गोविंद सोळंके, छत्रगुण मगर, वारकरी सेनेचे विठ्ठल महाराज कारके, दलित आघाडीचे गौतम कनकुटे, शहरप्रमुख मनीष कदम, संदीप लहाने, नवनाथ खांडेकर, पांडुरंग कावळे, नरेंद्र दिशागत, अविनाश शेरे, पवन घुमरे, युवासेना तालुकाप्रमुख अतुल डख, वैभव वैद्य, अरुण ताठे, अक्षय दिग्रसकर, अनिल मगर, समाधान लिपणे, दीपक झिंबरे, अमोल सातपुते, सुशांत मोगल, विकास गिराम, गुलाब खेडेकर, कृष्णा तिडके; तसेच बाजार समिती, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, सर्कलप्रमुख, बुथप्रमुख, शाखाप्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डख, खेडेकर यांचे रक्ताने प्रतिज्ञापत्र
युवासेनेचे सेलू तालुकाप्रमुख अतुल डख व शिराळा येथील गुलाब खेडेकर या शिवसेना कार्यकर्त्यांनी बुधवारी (२० जुलै) स्वतःच्या रक्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून प्रतिज्ञापत्र लिहिले आहे. त्यात शिवसेना आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर पूर्ण निष्ठा व्यक्त केली आहे. या संदर्भात सोशल मिडियावर दोघांनीही पोस्ट केली आहे.