काँग्रेस कार्यकर्त्यांची सेलूत निदर्शने

परभणी : भारतीय जनता पार्टी सरकारच्या राजकीय हेतूने प्रेरित होऊन, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची अमंलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) चौकशी करून जाणूनबुजून त्रास दिला जात आहे, या कारवाईच्या निषेधार्थ सेलू (जि.परभणी) तालुका काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी (२६ जुलै) जोरदार निदर्शने केली.
तालुकाध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळ्याजवळ ही निदर्शने करण्यात आली. या वेळी केंद सरकारच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. केंद्रशासनाकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून काही वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या केंद्रातील व राज्यातील विविध नेत्यावर हेतूपुरस्पर ईडीअंतर्गत नोटीस पाठवून जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनासुध्दा नोटीस पाठवून, त्यांची दोन दिवस ईडीमार्फत चौकशी करण्यात आली होती; परंतु काहीच साध्य झाले नाही. त्यापाठोपाठ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सुध्दा ईडी अंतर्गत एक दिवस चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. मंगळवारी पुन्हा ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. सोनिया गांधी यांची चौकशी ईडीने तात्काळ थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, शहराध्यक्ष शेख दिलावर, अश्विनी घोगरे, विनोद तरटे, इर्शादभाई, इम्तियाजखान, गौसभाई, नरसिंग हरणे, हरिभाऊ पोंडे, राजेंद्र गाडेकर, मुश्ताकभाई, साजिदभाई, अमजद बागवान, प्रदीप पवार, सुदर्शन शेरे, सतीश भोसले, इम्रानभाई, सिकंदरभाई, सोहेलभाई आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!