सेलूमध्ये फुलतेय स्वस्तिक उद्यान

Authored By Babasaheb Helaskar

परभणी : जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये वृक्षलागवडीसाठी विविध अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सेलू (जि.परभणी) पंचायत समिती परिसरात स्वस्तिक पद्धतीच्या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

पंचायत समितीच्या नवीन शासकीय निवासस्थानाच्या परिसरामध्ये शुक्रवारी (२९ जुलै) सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या विशेष पुढाकाराने आणि पंचायत समिती कर्मचार्‍यांच्या सामाजिक दायित्वामधून जिल्ह्यात एकमेव नाविन्यपूर्ण अशा स्वस्तिक उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या वेळी सेलू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विष्णू मोरे पाथरीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब खरात, कार्यालयीन अधीक्षक श्यामसुंदर बोराडे, कृषी विस्तार अधिकारी तोटेवाड, भोसले, पंचायत विस्तार अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्यासह पंचायत समिती कर्मचारी आणि तालुक्यातील ग्रामसेवक मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्वस्तिक उद्यानाचे सामाजिक दायित्व श्यामसुंदर बोराडे, प्रभाकर शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी करत आहेत.

स्वस्तिक उद्यानाचे फायदे

स्वस्तिक आकारात वृक्ष लागवड केल्यामुळे स्वस्तिकाच्या चार पाकळ्यांमध्ये जागा उपलब्ध राहते. त्या जागेचा उपयोग लॉन करण्यासाठी, मुक्त व्यायाम शाळा तयार करण्यासाठी, पेव्हर ब्लॉक टाकून वन भोजनासाठी होऊ शकतो.

उद्यान निर्मितीची पद्धत

१०० बाय १०० फूट जागा निवडल्यास सुमारे ८०० फूट अंतराची कडा मिळते. यावर चार फूट अंतरावर एक झाड लावल्यास दोनशे वृक्षांची लागवड करता येते. या पद्धतीमध्ये दहा प्रकारची फुल झाडे, दहा फळ झाडे अशा वीस प्रकारच्या प्रत्येकी दहाप्रमाणे २०० वृक्षांची लागवड करता येते.

स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवडीचा परभणी जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग सेलू येथील पंचायत समिती परिसरात राबविण्यात आला आहे. या पद्धतीत कमीजागेत जास्त वृक्षांची लागवड; तसेच वापरासाठी जागा सुद्धा उपलब्ध होते.

– ओमप्रकाश यादव,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हा परिषद, परभणी

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!