श्रीविठोजीबिरोजींच्या दर्शनाला मोठी गर्दी

परभणी : नागपंचमीनिमित्त सेलू (जि.परभणी) तालुक्यातील डिग्रस जहांगीर येथील श्रीविठोजीबिरोजींच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी मंगळवारी (दोन ऑगस्ट) दिवसभर मोठी गर्दी केली.

दरवर्षी मंदिर समिती व  गावकऱ्यांच्यावतीने पारंपरिक नागपंचमी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. गावातही घरोघरी पंचमीचा उत्साह कायम होता. करोनाचे निर्बंध नसल्याने यंदा सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ होती. पारंपरिक पद्धतीने श्रीविठोजीबिरोजींची पूजा-अर्चा, नैवेद्य उत्सव साजरा करण्यात आला. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ठिकठिकाणी भाविकांच्या चहापाणी, पिण्याचे पाणी, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन गावातील तरुण मंडळे व ग्रामस्थांनी उत्कृष्ट पद्धतीने केले होते. एका दिवसाच्या छाटेखानी यात्रोत्सवात विविध खेळण्याची दुकाने, मनोरंजनात्मक खेळाच्या ठिकाणी बच्चेकंपनी खूश झाली होती. प्रसादासाठीच्या लेवड्या, फुटाणे, पेढे यासोबत शेव, चिवडा, पापडी आणि छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी दुकाने लावली होती.

‘वावरी’ची वारी

श्रीविठोजीबिरोजी मंदिर परिसरातील वावरी (माती) घरी नेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक दरवर्षी नागपंचमीला डिग्रसला पारंपरिक वारी करतात. यंदाही वावरी खोदून नेण्यासाठी झुंबड उडाली. घरीदारी चौबाजूने वावरी शिंपडल्याने सापांपासून सरंक्षण मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिवाय परिसरातील वजनी गोटा उचलण्याची परंपराही भाविकांनी जपली आहे.

नारळ विक्रीची उलाढाल

श्रीविठोजीबिरोजीला प्रसाद म्हणून नारळ वाढविण्याची परंपरा भाविकांनी आजही जपली आहे.  त्यामुळे यंदाही नारळ विक्रेत्यांची पंचमी दणदणीत झाली. पंधरा ते वीस रुपये दर राहिला. सुमारे साठ ते सत्तर हजार नारळ विक्री झाली असेल, असे एका विक्रेत्याने सांगितले.

नागपंचमीला सेलू ते डिग्रस जहांगीर रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यात दुचाकींची संख्या मोठी असते. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक अधूनमधून ठप्प होत राहाते. परंतु या रस्त्याची बहुतांश ठिकाणी खड्ड्यांनी केलेली चाळणी कायम आहे. कोणालाच याचे काहीही वाटत नाही. यानिमित्तानेच याची बातमीपूर्ती चर्चा होते. तरीही वर्षातून एकदा श्रद्धेने बाहेरगावचे भाविक मोठ्या संख्येने श्रीविठोजीबिरोजीच्या दर्शनाला येतातच. कायमच इतका खराब रस्ताअसूनही एकमेकांच्या सहनशीलतेला सलामही करतात. शेवटी ‘श्रद्धेसाठी सबुरीही’ महत्वाचीच.  पण, काय खड्डे, काय रस्ता…कमालयबा तुमची ! डिग्रसकरांची.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!