परभणी : सेलू (जि.परभणी) येथे मंगळवारी, दोन ऑगस्ट रोजी आयोजित नागपंचमी उत्सवाला महिला, मुलींनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळच्यावेळी तर, मानाचे पाच झोके घेण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडाली होती.
नूतन रस्त्यावरील हुतात्मा स्मारक परिसरात माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळाच्या पुढाकाराने राजस्थानी महिला मंडळ, सेलू महिला मंडळ व शास्त्रीनगर महिला मंडळातर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नागदेवता पूजनाने उत्सवाची सुरुवात झाली. दुपारपासूनच राहाट पाळण्यात बसण्याचा; तसेच मानाचे पाच झोके घेण्याचा आनंद लुटण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. मिकी माऊसमधील घसरणीवरच्या उड्यांनी बच्चेकंपनी खूश झाली.सापांच्या विविध प्रकारच्या जातीचे प्रदर्शन पाहण्यासाठीही गर्दी झाली होती. यानिमित्ताने ‘उंच माझा झोका’ म्हणत मनसोक्त झोके घेण्याच्या आनंदाची संधी महिलांना मिळाली. संगीत खुर्ची, फुगडी, उखाणे, प्रश्नमंजुषा, दोरीवरच्या उड्या आदीसह विविध पारंपरिक सांस्कृतिक स्पर्धा झाल्या. पिण्याचे शुद्ध पाणी, फळे आदी व्यवस्था उत्तम करण्यात आली होती. गायक नरेंद्र राठोड व वाद्यवृंदातील कलाकारांच्या गायनाने सांगता झाली. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी बोराडे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी, संयोजन समितीतील महिलांनी परिश्रम घेतले.