गंगाखेड : कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची येत्या २ ऑक्टोबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पदयात्रेस पाठिंबा देत, केंद्र सरकारच्या जाचक कारभाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी परभणी जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने येत्या ९ ऑगस्ट रोजी गंगाखेड ते जिंतूर पदयात्रा केली जाणार आहे.
या संदर्भात गंगाखेड येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी ( तीन ऑगस्ट) बैठक संपन्न झाली. या वेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांनी ही माहिती दिली. जिल्हा सरचिटणीस बालासाहेब फुलारी, महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सदस्या प्रा.शुभांगी शिसोदिया, परभणी मनपा गटनेते भगवानराव वाघमारे, रामभाऊ घाडगे, सोनपेठ तालुकाध्यक्ष प्रा. मुंजाभाऊ धोंडगे, स्थायी समिती सभापती गुलमीर खान, जिल्हा उपाध्यक्ष ॲड संतोष मुंडे, ॲड हनुमंत जाधव, जेष्ठ नेते बाबुराव गळाकाटू, गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, युवा नेते सुशांत चौधरी, पालम तालुकाध्यक्ष कृष्णा भोसले, गुलाबराव सीरस्कर, सेवा दल तालुकाध्यक्ष रोहिदास घोबाळे, युवक प्रदेश सरचिटणीस प्रणित खजे, युवक जिल्हाध्यक्ष अभय कुंडगीर, मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, युवक मिडीया राज्य सहसमन्वयक सिद्धार्थ भालेराव, गणेश शिंदे, नितीन चौधरी, प्रमोद मस्के, उपसरपंच लक्ष्मण घोलप, हंसराज जाधव, शामराव मुंडे, पंडीत चौधरी, डॉ फेरोज शेख, संतोष समशेटे, नागेश डमरे, सुनील सोळंके आदींची प्रमुख उपस्थिती पस्थिती होती.
गंगाखेड येथून पदयात्रेला प्रारंभ होऊन जिंतूरात समारोप होणार आहे. जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते सहभागी होतील. जवळपास १०० किमी अंतराच्या या पदयात्रेचे पाच मुक्काम होणार असून ठिकठिकाणी सभा, बैठका, विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. ही पदयात्रा जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत पदयात्रेत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार वरपुडकर यांनी केले आहे.
येत्या ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गंगाखेड येथून या पदयात्रेचा शुभारंभ होणार असून, तालुका आणि शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जय्यत तयारी करणार, असे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस यांनी सांगितले.