परभणी : सेलू (जि.परभणी) येथील सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सुमती माणिकराव कोंडपल्ले (वय ८६) यांचे रविवारी (सात ऑगस्ट) दुपारी पावणे दोन वाजता औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (आठ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता औरंगाबाद येथील प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीमती कोंडपल्ले ह्या सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेत १९६८ पासून शिक्षिका, तर १९७४ ते १९९४ या कालावधीत नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. शिस्तप्रिय मुख्याध्यापिका म्हणून त्यांचा नावलौकिक होता. विविध अभ्यासपूरक उपक्रम त्यांनी राबवले. परभणी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. एक आदर्श शिक्षिका, उत्तम कवियत्री म्हणून त्या परिचित होत्या. गायनाचा छंद त्यांनी जोपासला होता. औरंगाबाद येथील माणिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.उल्हास कोंडपल्ले; तसेच डॉ.उदय कोंडपल्ले व सविता बोर्डे-कोंडपल्ले यांच्या त्या मातोश्री होत.