स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह

सेलू : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेलू (जि.परभणी) शहरासह ग्रामीण भागात विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. सायकल रॅली, चित्रकला, समूह नृत्य, समूहगीत गायन स्पर्धा आदी सांस्कृतिक उपक्रमांमधून कमालीचा उत्साह दिसून आला. पंधरा ऑगस्टपर्यंत शहरासह ग्रामीण भागात शाळा, सामाजिक संस्था व प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सेलू येथे लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सायकल रॅली काढण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, मुख्याधिकारी देविदास जाधव, मुख्याध्यापक नारायण सोळंके, संगीता खराबे आदींसह विविध शाळांचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक उत्साहात सहभागी झाले होते. शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय, नगरपालिका व नूतन विद्यालयातर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

‘घर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिकेच्या तिरंगा विक्री स्टाॅलचा शुभारंभ झाला. साई नाट्य मंदिरात आयोजित समूह नृत्य, समूहगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सामूहिक राष्ट्रगीत गायन 

मंगळवारी (९ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर सामूहिक राष्ट्रगीत गायन आयोजित करण्यात आले. शहरातील सर्व शालेय विद्यार्थी, महिला, नागरिकांनी साडेदहा वाजता मैदानावर उपस्थित राहावे.

गुरुवारी रांगोळी, पाककृती स्पर्धा 

गुरुवारी (११ ऑगस्ट) दुपारी तीन वाजता श्री साईबाबा मंदिरात महिला व मुलींसाठी देशभक्तीपर रांगोळी स्पर्धा आहे; तसेच तिरंगा रंगांमधील खाद्यपदार्थ स्पर्धा आहे. खाद्यपदार्थ महिलांनी घरून तयार करून आणावयाचे आहेत. सहभाग व अधिक माहितीसाठी गिरीश लोडाया,[8424885593] यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांत; तसेच ‘घर घर तिरंगा’ अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, मुख्याधिकारी देविदास जाधव, संयोजकांनी केले आहे.

(सर्व छायाचित्रे : ओम फोटो) 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!