…आता तरी पूल बांधा हो !
नरसापूर ग्रामस्थांचे तिरंगा हाती घेऊन पुलासाठी आंदोलन
नरसापूर ता.सेलू : ठिकठिकाणी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जल्लोष सुरू असतांना, सेलू (जि.परभणी) तालुक्यातील नरसापूर येथील ग्रामस्थांनी, ” पंचाहत्तर वर्ष झाली, आता तरी आमच्या नदीवर पूल बांधा हो “, अशी आर्त साद घालत शनिवारी (१३ ऑगस्ट) नदीपर्यंत तिरंगा रॅली काढून आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले.
मुलांबाळांसह महिला, पुरुष, जेष्ठ नागरिकांनी तिरंगा हातात घेवून पाण्यात उभे राहून घोषणा दिल्या. सेलू तालुक्यातील देवगाव फाट्यावरून पाच किलोमीटरवर नरसापुर हे चारशे लोकवस्तीचे गाव आहे. गावाला लागूनच करपरा नदी आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून अद्यापपर्यंत करपरा नदीवर पूल उभारला गेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल कायम आहेत.
सहा सहा महिने नदीत पाणी असते. पावसाळ्यात तर दुधडी भरून वाहते. पूरस्थितीत ग्रामस्थांचा शहरांशी पूर्णतः संपर्क तुटतो. नदी पार केल्याशिवाय गावकऱ्यांपुढे पर्यायच शिल्लक नाही. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना देवगावफाटा अथवा सेलू, मंठा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. जीवनावश्यक वस्तू, खते, बी-बियाणे खरेदी आणि रुग्णालयातील उपचारासाठी जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागते. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने गावात जाऊ शकत नाहीत. पावसाळ्यात अत्यवस्थ रुग्ण, गर्भवती मातेला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन येऊ शकत नसल्याने रुग्णास पाठीवर बांधून, दोरीच्या साहाय्याने, बांबूच्या सहाय्याने झोळणी करून किंवा बाजेवर झोपवून देवगाव फाटा गाठवा लागतो. संततधार पावसात नदीच्या काठाला बांधलेल्या दोरीच्या साह्याने नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून कमरेइतक्या पाण्यातून नदी पार करावी लागते.
शनिवारी तिरंगा हाती घेऊन करपरा नदीपात्रात आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करूनही पूलाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात तरी नदीवर पूल बांधवा, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली.
वाचा : मंत्री अतुल सावे यांचा परभणी जिल्हा दौरा