STRONG WILL : …आणि अनुष्का शाळेत आली; बोललीसुद्धा
परतूर : शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनाचा उत्साह…गेल्या आठ महिन्यांपासून दुर्धर आजाराशी झुंज देत, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या (Strong Will) जोरावर बरी झालेली चिमुकली अनुष्का शाळेत आली. भरभरून बोलली. भारावून टाकलं सर्वांना.
परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणारी अनुष्का अशोक आकात. अतिशय हुशार. प्रत्येक कार्यक्रमात भाषण करायला तिला आवडते. पहिल्या वर्गापासून ती भाषणाची तयारी करायची. आई वडील, शिक्षक प्रोत्साहन द्यायचे; परंतु गेल्या आठ महिन्यांपासून अनुष्का शाळेत आलीच नाही. कारणही तसेच होते. नेहमीच होणार्या डोकेदुखीमुळे ती त्रस्त होती. तपासणी केली, तर मेंदूत गाठ झाली असल्याचे कळाले. पालकांची परिस्थिती बेताची. मात्र लेकीच्या उपचारासाठी पालकांनी औरंगाबाद गाठले. आर्थिक अडचणी आल्या. पण डगमगले नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अनुष्काच्या मेंदूतील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सहा महिन्यांपासून अनुष्का अंथरुणावर खिळून होती. तिला चालता-बोलता येत नव्हते; परंतु दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आता तिच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत आहे. शालेय मित्र, मैत्रिणी, शिक्षक, शिक्षिका, शाळेचे आनंददायी वातावरण तिला सारखे खुणावते. सध्या तीला चालता येत नाही; परंतु स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त झेंडावंदनला जाण्याचा आग्रह अनुष्काने आई- वडीलांकडे धरला. आणि सोमवारी (१५ ऑगस्ट) आई-वडिलांसोबत अनुष्का शाळेत आली. सर्वाना आश्चर्य व आनंद झाला. प्रत्येक कार्यक्रमात बोलणारी अनुष्का पुन्हा एकदा भाषण करू लागली. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. उपस्थितांचे पाणावलेले डोळे पाहात होते. ऐकत होते. भारावून गेले होते. आणि अनुष्काच्या इच्छाशक्तीला दाद देण्यासाठी प्रत्येकाचे हात कौतुकाचा नाद करीत होते.
सोमवारी (१५ ऑगस्ट) आई-वडिलांसोबत अनुष्का शाळेत आली. सर्वाना आश्चर्य व आनंद झाला. प्रत्येक कार्यक्रमात बोलणारी अनुष्का पुन्हा एकदा भाषण करू लागली. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. उपस्थितांचे पाणावलेले डोळे पाहात होते. ऐकत होते. भारावून गेले होते. आणि अनुष्काच्या इच्छाशक्तीला दाद देण्यासाठी प्रत्येकाचे हात कौतुकाचा नाद करीत होते.
हेही वाचा : Minister Atul Save : ३४६ कोटी ८८ लाखांचा पिक विमा जमा