ढोलताशा : शुल्कवाढ विरोधात सेलू पालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन
कागदपत्रांसाठीची जाचक शुल्कवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी
सेलू : नगरपालिका कार्यालयाने मृत्य, जन्म प्रमाणपत्र, पी.टी.आर. नक्कल, गावठाण प्रमाणपत्र, बेबाकी प्रमाणपत्र, नामांतरण, हस्तांतरण, झोन दाखला, अशा अनेक प्रकारच्या नगर पालिकेमधील सर्व सामान्य नागरिकांच्या कामासाठी आवश्यक कागदपत्रांच्या शुल्कात अवाजवी दरवाढ केली आहे. ती तात्काळ रद्द करून पूर्वीचे दर लागू करावेत या मागणीसाठी अर्जून शंकरराव बोरुळ यांनी सोमवारपासून (२२ ऑगस्ट) पालिका कार्यालयासमोर ढोल वाजवत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या संदर्भात अर्जून बोरुळ यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. १० ऑगस्ट रोजीच्या एका दैनिकात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार नगरपालिका कार्यालयाने मृत्य, जन्म प्रमाणपत्र, पी.टी.आर. नक्कल, गावठाण प्रमाणपत्र, बेबाकी प्रमाणपत्र, नामांतरण, हस्तांतरण, झोन दाखला, अशा अनेक प्रकारच्या नगर पालिकेमधील सर्व सामान्य नागरीकांच्या कामासाठी लागणारे कागदपत्रे उपलब्ध करुन देणेसाठी कार्यालयीन फीस अवाजवी तथा दुप्पट ते तिप्पट स्वरुपात वाढ केलेली आहे. याबाबतचा प्रशासकीय ठराव पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सदर वाढ ही अत्यंत बेकायदेशीर, अन्यायकारक, जाचक स्वरुपाची आहे. त्यामुळे गोर गरीब, सर्व सामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा विनाकारण पडणार आहे. आधीच गोर-गरीब सामान्य जनता ही वाढत्या महागाईमुळे परेशान असून त्यांचे जगणे मुश्किल झालेले आहे. याबाबत आपणास दिनांक ११ ऑगस्ट रोजी रितसर अर्ज दिलेला आहे. त्यामध्ये नगर परिषद कार्यालयाने हे दुप्पट ते तिप्पट स्वरुपात वाढलेले दर रद्द करून पूर्वीप्रमाणे दर करण्याची विनंती मागील अर्जाद्वारे केलेली आहे; परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे दर रद्द करण्याबाबत किंवा दरवाढ थांबविण्याबाबत समाधानकारक व सकारात्मक उत्तर देण्यात आलेले नाही; तसेच कोणत्याही प्रकारचे आश्वासन देण्यात आलेले नाही. यावरुन असे लक्षात येते की, आपल्या कार्यालयाला दरवाढीबाबत काहीही फरक पडणार नाही. शनिवारी लाक्षणिक उपोषण करुन सुध्दा कोणत्याही सकारात्मक उत्तर न मिळाल्याने सोमवारपासून नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. झोपलेल्या नगरपालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी सोमवारी ‘ढोल बजाव ताशा बजाव’ आंदोलन करण्यात आले. भाजप युवा मोर्चाचे महादेव गायके, बाळासाहेब काजळे, दत्ता पवार, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत, सय्यद नियाजोद्दीनभाई आदींसह नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.
जोपर्यंत कागदपत्रावरील वाढीव शुल्कवाढ दर रद्द होत नाहीत. तोपर्यंत दररोज सकाळी साडेदहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सेलू नगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अर्जून बोरुळ यांनी केले आहे.
हेही वाचा : Spiritual : ब्रह्माकुमार डॉ.सचिन परब यांचे सेलूत आज प्रवचन