प्रेरणादायी : महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘शुभंकरोती’ चा पुढाकार महत्त्वपूर्ण

प्रेरणादायी : महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘शुभंकरोती’ चा पुढाकार महत्त्वपूर्ण

पत्रकार डी.व्ही.मुळे : सेलूत प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण

सेलू : विविध संस्थांच्या समन्वयातून महिलांना स्वावलंबी करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम, प्रकल्प, प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजनात शुभंकरोती फाऊंडेशन सातत्याने पुढाकार घेत आहे. ‘शुभंकरोती’ चे हे कार्य प्रेरणादायी आहे, असे मत जनहित कृषी विज्ञान विकास मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डी.व्ही.मुळे यांनी व्यक्त केले.

शुभंकरोती फाऊंडेशन, देसाई फाऊंडेशन व स्कोर संस्थेच्या माध्यमातून सेलू शहरात सुरू असलेल्या शिलाई मशीन,‌संगणक व पार्लर प्रशिक्षणाच्या पहिल्या  त्रैमासिक वर्गात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी (२३ ऑगस्ट) प्रमाणपत्र वितरण करण्यात आले होते. त्यावेळी मुळे बोलत होते. श्री केशवराज बाबासाहेब मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला.या वेळी मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर, सेलू महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया कोठेकर, रोहिणी कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार नारायण पाटील, संस्थेचे अध्यक्ष किरण चौधरी यांची प्रमुख उपस्थती होती. प्रारंभी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन झाले. किरण चौधरी यांनी संस्थेच्या कार्याचा,विविध उपक्रमाचा; तसेच भविष्यातील योजनांची माहिती दिली. फाऊंडेशन मधील सर्व प्रशिक्षक, कार्यकर्त्या व प्राशिक्षणार्थी यांच्या मुळेच हा उपक्रम यशस्वी होत असल्याचे नमूद केले.

मुळे म्हणाले, ” किरण चौधरी यांची कर्मभूमी जरी नांदेड असली, तरी जन्मभूमीला न विसरता त्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून सेलूत कार्य सुरू केले आहे. मनुष्य बळ, निधी व वेळ या त्रिसूत्रीचा उपयोग करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले हे कार्य निश्चितच वाखाण्याजोगे आहे. सेलूत सुरू केलेल्या कार्डियक मशीन सेवेमुळे निश्चितच अनेक रुग्णाचे प्राण वाचले आहेत.” अभिजित राजूरकर म्हणाले, ” शुभंकरोती फाऊंडेशनचे कार्य पहाता या संस्थेला पालक संस्था म्हणनेच उचित ठरेल. प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो व रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ मिळते. प्रमाणपत्र प्राप्त महिलांनी प्रशिक्षणाच्या संधीचे सोने करून घ्यावे.”

विजया कोठेकर व रोहिणी कुलकर्णी यांनी देखील शुभंकरोती फाऊंडेशन महिलांसाठी हाती घेत असलेल्या उपक्रमांबाबत आभार व्यक्त केले. या वेळी शुभंकरोती प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण चौधरी, परभणी जिल्हा समन्वयक निशिकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मोनिका चव्हाण, आयेशा शेख व ज्योती जोशी यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्याबद्दल शुभंकरोती फाऊंडेशन व प्रशिक्षकांचे आभार मानले. श्वेता गबाळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!