महिलांच्या कायदेविषयक शिबिराला सेलूत प्रतिसाद
अभय केंद्र व महिला समुपदेशन केंद्राचा उपक्रम
सेलू : अभय केंद्र व महिला समुपदेशन केंद्र यांच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ विषयक जाणीव जागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी संरक्षण अधिकारी यु.एन.मोरे, पोलिस निरीक्षक आर.जी.गाडेवाड विधी सल्लागार सुमन उफाडे, क्रांती फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा विधी सल्लागार पोर्णिमा जोहिरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला लिपणे, समुपदेशक सुमन सोनटक्के, सुमन वाघमारे यांची उपस्थिती होती. या वेळी उफाडे यांनी महिलाविषयक विविध कायद्याच्या तरतुदींची माहिती दिली. महिलांनी जागरूकपणे अन्यायाविरुध्द उभे राहिले पाहिजे. कायद्यानुसार न्याय मिळवण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड म्हणाले, ” अन्यायाविरुध्द महिलांनी निर्भीडपणे तक्रार नोंदवावी. सेलू पोलीस ठाणे सदैव मदतीसाठी तत्पर आहे. ” पोर्णिमा जोहीरे यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा -२०१२ (पॉस्को ॲक्ट) याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन सुमन सोनटक्के यांनी केले. दामीनी पथकाचे दीपक कराळे यांनी आभार मानले.