सेलूत रुद्राभिषेक सोहळा उत्साहात
एकशे एक जोडप्यांचा सहभाग, साईबाबा मंदिर संस्थान व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे आयोजन
सेलू : येथील आर्ट आफ लिव्हिंग परिवार व महेशनगरातील साईबाबा मंदिर संस्थानतर्फे श्रावणमासानिमित्त गुरुवारी, २५ ऑगस्ट रोजी आयोजित रुद्राभिषेक पूजा उत्साहात झाली. सेलूतील विविध सामाजिक घटकांतील एकशे एक जोडप्यांनी रुद्राभिषेक सोहळ्यात सहभाग घेतला.
बेंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या गुवाहाटी आश्रमाचे स्वामी ज्ञानेश्वरानंदजी व याज्ञिकांच्या मंत्रोच्चारात सकाळी आठ ते अकरा या वेळेत विधीवत पूजा झाली. यात शहरातील एकशे एक जोडप्यांनी सामूहिक संकल्प सोडला. पूजेची साधन सामुग्री संयोजन समितीतर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे राज्य समन्वयक पुरुषोत्तम वायाळ, जिल्हा समन्वयक किशोर घडे, सहयोगी समन्वयक कैलास कदम, सचिन कोरडे आदींची उपस्थिती होती. राजेंद्र पवार, भारत काठोटे, नितीन कापसे व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, साईबाबा मंदिर संस्थानचे पदाधिकारी व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.