INSPIRATIONAL : राष्ट्रीयस्तरावर सेलूच्या गुणवत्तेचा दबदबा
जयप्रकाश बिहाणी यांचे प्रतिपादन, क्रीडाशिक्षकांचा कार्यगौरव
सेलू (जि.परभणी) : चाकोरीबद्ध जीवनाच्या पलीकडे जाऊन काम करणारी माणसे यशाचे मानकरी ठरतात. सेलू तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचे क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान त्यापेक्षाही उच्च दर्जाचे आहे म्हणूनच सेलूच्या गुणवत्तेचा दबदबा राष्ट्रीय पातळीपर्यंत कायम आहे, असे गौरवोद्गार नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी यांनी काढले.
येथील नूतन महाविद्यालयात तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना व नूतन महाविद्यालयाच्यावतीने सोमवारी, २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची १२७ वी जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राज्य पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिहाणी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे होते. वकील संघाचे उपाध्यक्ष उमेश खारकर, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांची उपस्थिती होती. राज्य क्रीडाशिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रशेखर नावाडे ,प्रा.नागेश कान्हेकर, प्रा.डॉ के.के.कदम, डी.डी.सोन्नेकर, डी.एस.सुरवसे, सतीश नावाडे, गणेश माळवे, किशोर ढोके , सुभाष मोहकरे, जेष्ठ क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त राजेभाऊ चव्हाण; तसेच मुख्याध्यापक पदी निवड झालेल्या संगीता खराबे, पी.एस.कौसडीकर, महादेव खरात यांचा सन्मानचिन्ह, शाल, पुष्पहाराने कार्यगौरव करण्यात आला.
प्रास्ताविक संघटनेचे तालुका सचिव प्रा.नागेश कान्हेकर, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर आभार संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश माळवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्विन केदासे, सुनिल गायकवाड, रावसाहेब पदमपल्ले, दत्तात्रय आवचार, सगर फारूकी, सुनिल राठोड, अक्षय साळवे, शरद पवार, संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, नूतन महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.