Teacher’s Day : मुलांनो, समाजात आदर्श उंची गाठा
पुरस्कारप्राप्त क्रीडाशिक्षक सतीश नावाडे यांचे प्रतिपादन, सेलू येथील नूतन विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात
सेलू (जि.परभणी) : शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध पुरस्कारांनी सन्मानित नूतन विद्यालयातील क्रीडाशिक्षक सतीश नावाडे यांचा सपत्नीक कृतज्ञता गौरव करण्यात आला. या वेळी बोलतांना सतीश नावाडे म्हणाले, ” शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी अभ्यासोबत खेळाच्या उपक्रमांतदेखील परिश्रमाचे सातत्य राखून समाजात आदर्श उंची गाठावी”
नूतन विद्यालय पालक शिक्षक संघातर्फे सोमवारी, पाच सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक नारायण सोळंके होते. सतीश नावाडे, अनुराधा नावाडे, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक डी.डी.सोन्नेकर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष डॉ.प्रजीत रावते, सचिव पी.टी.कपाटे, सहसचिव अश्विनी घोगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या निमित्ताने शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात सतीश नावाडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. एक विद्यार्थी प्रिय, तळमळीचे शिक्षक म्हणून नावाडे यांचे आजवरचे कार्य संस्मरणीय ठरत आले आहे, अशा शब्दांत क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे यांनी नावाडे यांचा कार्यगौरव केला. डॉ.प्रजीत रावते, अश्विनी घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले. नारायण सोळंके यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक पी.टी.कपाटे, सूत्रसंचालन काशीनाथ पल्लेवाड, तर उज्ज्वला लड्डा यांनी आभार मानले. या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते सतीश जाधव, सुनील गायकवाड यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. पालक शिक्षक संघाचे सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते.
विविध आठवणींना उजाळा देत, सतीश नावाडे यांनी; गुरुजन, जेष्ठ मार्गदर्शक यांचे प्रेम आणि विश्वास यामुळे माझी शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील आजवरची वाटचाल आनंदी होत आली आहे. विविध खेळातून घडलेले शाळेचे राज्य, राष्ट्रीय खेळाडू आज विविध क्षेत्रात उच्च पदावर आहेत. शाळेचा लौकिक वाढवित आहेत. याचा सदैव आम्हा शिक्षकांना अभिमान वाटतो, असे नावाडे यांनी या वेळी नमूद केले.