Lumpy Virus : सेलू तालुक्यात लम्पी लसीकरण मोहीम तात्काळ राबवा
डॉ.संजय रोडगे : रवळगाव, देऊळगाव गात सर्कलमधील शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन
सेलू : येथील रवळगाव सर्कल मधील कापूस पिकावर गोगलगायचा प्रादुर्भाव, आकस्मिक मर यासारख्या रोगामुळे पिकाचे नुकसान झाल्यामुळे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी. सेलू व देऊळगाव मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावा. लम्पी लसीकरण मोहीम तात्काळ राबवावी या मागण्यांचे निवेदन गुरुवारी, १५ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजय रोडगे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला देण्यात आले.
रवळगाव सर्कल मधील लाडनांद्रा, गोहेगाव, डासाळा, बोरगाव, लीपणे बोरगाव, खवणे पिंपरी, रवळगाव, वाकी, वाघ पिंप्री, शिंदे टाकळी, माले टाकळी, राधे धामणगाव व म्हाळसापूर परिसरात यंदा जूनच्या सुरुवातीला पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी घाई करून कपाशीची लागवड केली. मृग नक्षत्रात झालेला पावसाचा यास फायदा होऊन पिकांची उगवनही चांगली झाली. अचानक जास्तीचा सततचा पाऊस झाल्यामुळे कापसाचे प्लॉटच्या प्लॉट “आकस्मिक मर” सदृश्य रोगामुळे सुकून गेली आहे. तसेच सोयाबीन पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतू आता उगवून आलेल्या पिकांवर परिसरातील अनेक भागात गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यांच्याकडून नुकतेच जमिनीतून वर आलेले अंकुर फस्त केले जात आहे. पिकांवर किडींचा झालेल्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पिकांचे जास्त नुकसान करणारी कीड म्हणून गोगलगाय ओळखली जाते. ही कीड कपाशी, सोयाबीनचे बियाणे फस्त करून टरफल शिल्लक ठेवते तर रोपांवरील पानासहीत संपूर्ण रोप खाऊन टाकतात. कपाशी उगवून वर येताच त्यावर गोगलगाय करून निम्मे पिक फस्त केले आहे. शेतकऱ्यांनी शेतात अधिकचा खर्च केलेला असून 90% शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्यावर दुबार लागवड व कर्जबाजारी होण्याची वेळ येईल.
सध्या लम्पी त्वचा रोगामुळे पशुपालकांसह इतर नागरिकांमध्ये देखील धडकी भरली आहे. लम्पी त्वचा रोग झालेल्या जनावरांमध्ये ताप येणे, चारा न खाणे, त्वचेवर गाठी येणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात तसेच डोळे आणि नाकातून स्त्राव येणे, तोंडातून लाळ गळणे, दुध उत्पादन कमी होणे, अशी लक्षणे आढळून येत असल्याचे निदर्शनास आले आहेत.निवेदनावर रवळगावचे सरपंच दीपक रोडगे, अनंत रोडगे, शिवाजी नाईकनवरे, गणेश रोडगे भरतनाना लहाने, प्रकाश गजमल, संजय गटकळ, बळीराम चव्हाण, उद्धव गायकवाड, भागवत मोगरे, इंद्रजीत लीपणे, गोविंद लीपणे, अशोक चाळके, भगवान शिंदे, संजय वाघ, अजय वाघ, मुंजाभाऊ पवार, गणेश ढवळे, सुनील लहाने, एकनाथ लहाने, भीमराव गोरे, गंगाधर नाईकनवरे आदी रवळगाव सर्कल मधील शेतकर्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.