महापूर : येलदरी, सिद्धेश्वर सर्व; निम्न दुधनाच्या दहा दरवाजातून पाणी सोडले
सिद्धेश्वरचे १४, येलदरी १०, तर निम्न दुधनाच्या ८ दरवाज्यातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

सेलू : पूर्णा नदीवरील येलदरी, सिद्धेश्वर, खडकपूर्णा ही तीनही धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे या धरणातून सोमवारपासून मोठा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे सेलू ( जि.परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना सिंचन प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला. सोमवारी मध्यरात्री पासून दहा दरवाज्यातून १० हजार १०० क्युसेक दराने दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. वीस पैकी दहा दरवाजे ०.३० मीटरने उचलून विसर्ग सुरू करण्यात आले. मात्र, मंगळवारी सकाळी दोन दरवाजे बंद करून विसर्ग ८०८० क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे दुधना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील लहान उंचीच्या पूलावरून पाणी वाहात आहे. राजवाडी मार्गे वालूर वाहतूक बंद झाली. पाऊस आणि धरणांतील विसर्गामुळे दुधना, पूर्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काठावरील गावांना सावधानतेचा इशारा पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रातील जालना जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मंठा, परतूर तालुक्यात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे धरणात पाण्याची आवक वेगाने वाढत आहे. विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.
मंगळवारी, २० सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजता जलाशय पाणीपातळी 425.200 मीटर, एकूण जलसाठा 283.921 दशलक्ष घनमीटर, प्रकल्पीय साठा 344.800 दशलक्ष घनमीटर, जीवंतसाठा 181.321 दशलक्ष घनमीटर, प्रकल्पीय जीवंत साठा 242.200 दशलक्ष घनमीटर, जीवंत साठा टक्केवारी 74.86 टक्के आहे.मागील चार तासातील येव्याचे परिमाण 4.118 दशलक्ष घनमीटर आहे. चार तासांत सरासरी 10 हजार 99 क्युसेक्स दराने पाण्याची आवक झाली आहे, तर मागील 4 तासांतील विसर्ग परिमाण : 4.118 दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.
देऊळगाव मही ( जि.बुलडाणा) येथील खडकपूर्णा धरणाच्या सर्व १९ दरवाज्यातून ४४,५०८ क्युसेक विसर्ग सोमवारी दुपारी चार वाजता सुरू करण्यात आल्याने येलदरीचे सर्व दहा, तर सिद्धेश्वरच्या सर्व १४ दरवाजे उघडून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, सकाळी पाच वाजता खडकपूर्णा चा विसर्ग घटवून ९८२८ क्युसेक करण्यात आला आहे.
सायंकाळी सात वाजल्यापासून सिद्धेश्वर धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. १४ दरवाज्यातून ३३२३९ क्युसेक, तर वेस्ट वेअर ३७७४ क्युसेक असा एकूण ३७०१३ क्युसेक दराने पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. येलदरी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आज धरणाची सकाळी चार दरवाजे, दुपारी सहा दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र देऊळगाव मही येथील खडकपूर्णा धरणाच्या 19 दरवाज्यातून 44 हजार 408 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले. येलदरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून 32 हजार 768 क्यूसेक्स विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडला. विसर्ग वाढल्याने पूर्णा नदी काठच्या गावांना पाटबंधारे विभागाचे अधिकारी बी.के.शिंदे ,खडकपूर्णा प्रकल्पाचे प्रकल्प निरीक्षक राहुल गुंजाळ यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, खडकपूर्णा आणि येलदरी धरणातून प्रचंड प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने सिद्धेश्वर धरणाचा साठा वाढला आहे. सिद्धेश्वरचे सर्व 14 दरवाजे उघडून विसर्ग 33239 व वेस्ट वेअर ४१५६ असा एकूण ३७३९५ क्युसेक दराने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे पूर्णा नदीला महापूर आला आहे.
येलदरी : सर्व १० दरवाजे व विद्युत निर्मिती केंद्र मिळून ३२,७६८ क्युसेक, खडकपूर्णा : सर्व १९ दरवाजे ४४,४०८ क्युसेक ( मंगळवारी सकाळी पाच वाजता ९८२८ क्युसेक) निम्न दुधना : सर्व दहा दरवाजे : १०१०० क्युसेक ( मंगळवारी सकाळी सहा वाजता ८०८० क्युसेक, सिद्धेश्वर : सर्व १४ दरवाजे : ३७३९५ क्युसेक