प्लास्टिक : बंदीसाठी सेलू पालिकेची जनजागृती मोहीम, कारवाईत 25000 रुपयांपर्यंत दंड वसुलीची तरतूद
सेलू पालिकेचे सुधारित आदेश : जनजागृतीसाठी बैठकांचे नियोजन, कारवाईसाठी ठिकठिकाणी पथकांची नेमणूक
सेलू जि.परभणी : सेलू नगर परिषद हद्दीत सर्व विक्रेते व ग्राहक यांचेकडून एकल वापर (single use) प्लॅस्टिक पिशव्यांचे पूर्णतः उच्चाटन होणे अपेक्षित आहे. सर्व प्रकारचे एकल वापर प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक ग्लास, चमचा,स्ट्रॉ इत्यादी घटकावर पूर्णतःबंदी असून, अशा घटकांचा वापर करणारे विक्रेते व ग्राहक दंडास पात्र आहेत. शहरात पूर्णतः प्लास्टिक बंदीसाठी नगरपालिकेने २१ सप्टेंबर रोजी एका सुधारित आदेशानुसार ठिकठिकाणी पथकांची नेमणूक केली असून, बंदी असलेले प्लास्टिक आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, २२ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्लास्टिक निर्मूलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी हा आदेश काढला आहे. सेलू नगर परिषद हद्दीत प्लास्टिक निर्मूलन सप्ताहाचे आयोजन केले असून, या कालावधीदरम्यान नगर परिषद हद्दीतील सर्व विक्रेते व ग्राहक यांचेकडून एकल वापर (single use) प्लॅस्टिक पिशव्यांचे पूर्णतः उच्चाटन होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक अधिसूचना 2018 नुसार प्रतिबंधीत असलेले सर्व प्रकारचे एकल वापर प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक ग्लास, चमचा, स्ट्रॉ इत्यादी घटकावर पूर्णतः बंदी असून, अशा घटकांचा वापर करणारे विक्रेते व ग्राहक दंडास पात्र आहेत.
दंडात्मक कारवाई :1) 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या व 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. 2) पोलीस्टायरिन व विस्तारीत पोलिस्टायरिन वस्तूंवर (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) यावर 01 जुलै 2022 पासून बंदी घालण्यात येत आहे. 3) नागरीकांनी / दुकानदारांनी अनधिकृत व अप्रमाणित प्लास्टिकचा वापर टाळावा. 4) व्यापाऱ्यांनी प्लास्टीक पिशवी वापर करणे, ग्राहकांना देणे व घाऊक प्रमाणात साठा करणे. 5 ) नियमांचा भंग केलेस सदर व्यक्ती शिक्षेस पात्र ठरेल.
शिक्षा :
1) पहिला गुन्हा घडल्यास रुपये 5,000/- दंड. 2) दुसरा गुन्हा घडल्यास रुपये 10,000/- दंड. 3) त्यापुढील होणाऱ्या गुन्ह्यास तीन महिने कारावास व 25,000/- दंड 4) वरील गुन्ह्यास मदत करणारा किंवा साहित्य देणारा यांनाही दोषी धरून कारवाईस पात्र राहील.
सेलू नगर परिषदेने यापूर्वी जनजागृती, पर्यायी कापडी, कागदी पिशव्यांची उपलब्धता व दंडात्मक कार्यवाही या अनुषंगाने अनेक उपक्रम हाती घेऊन प्लास्टिक बंदी बाबत उपाययोजना केलेल्या आहेत तरीही काही प्रमाणात प्लास्टिक वापर दिसून येतो. प्लास्टिक वापरावर कायमस्वरुपी बंदी घालण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आखून उपाययोजना करण्याकरिता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे तसेच इंडियन स्वच्छता लीगचे औचित्य साधून प्लास्टिक निर्मूलन सप्ताह राबविण्यात येत आहे. मोहिमेअंतर्गत शहरात एकूण चार झोन करण्यात आले आहेत. २७ सहायक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश आहे.
झोन क्रमांक एक : गोविंद बाबा चौक ते क्रांती चौक पूर्व भाग गोविंद बाबा चौक ते क्रांती चौक पूर्व भाग. पथक प्रमुख: काशीनाथ धुळगंडे, सुदर्शन कोरे. सहायक: शरद खरावणे, भागवत इंद्रोके, कैलास कापुरे, नीळकंठ मोगल, महादू उगले, झोन क्रमांक दोन : गोविंद बाबा चौक ते क्रांती चौक दक्षिण भाग. पथक प्रमुख : शुभम धूत, सहायक : सुधाकर देशमुख, डी.के.बायस ठाकुर, एच.बी.खोडके, शेख मोईन शेख मतीन, सतीश लोंढे, झोन क्रमांक तीन : क्रांती चौक ते लक्ष्मी मॉल पुर्व भाग. पथक प्रमुख : एस.बी.स्वामी, सहायक : सुरेश भांडवले, शेख रहीम शेख मुसा, संतोष भगत, अन्सार रंगरेज, उमाकांत बेंद्रे, रवी पेवारे. झोन क्रमांक चार : क्रांती चौक ते लक्ष्मी मॉल दक्षिण भाग. पथक प्रमुख : नितीन ईजाते, सहायक : मुस्तजाब खान, गणेश सुरवसे जी.बी.जोशी, पी.एस.चौबी, आबाराव नखाते, आनंद काबरा यांचा समावेश आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्लास्टिक निर्मूलन सप्ताह उपक्रम : 22, 23 सप्टेंबर : प्लास्टिक पिशवी न वापरणे बाबत शपथ (नगर परिषद कार्यालय व छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांती चौक, तहसील कार्यालय), 24 सप्टेंबर : पर्यायी कापडी/ कागदी पिशव्या वापरण्या बाबत जनजागृती, 26 सप्टेंबर : शहरातील स्वयंसेवी संस्था, स्वयं प्रेरणेने प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार घेणारे नागरिक यांच्या सोबत चर्चा व अभियानाला गती देणे. 27 सप्टेंबर : विविध व्यवसायिकांसोबत बैठका व प्लास्टिक बंदी बाबत मार्गदर्शन 28 सप्टेंबर : प्लास्टिक जप्ती व दंडात्मक कार्यवाहीला सुरुवात, 29, 30 सप्टेंबर : प्लास्टिक जप्ती व दंडात्मक कार्यवाही.