पंढरपूर : भजन, कीर्तन बंदचा पाथरीतील भजन मंडळाकडून निषेध
पूर्वापार चालत आलेली परंपरा पूर्ववत करावी, तहसीलदारांना दिले निवेदन
अन्वर शेख, पाथरी
पाथरी : पंढरपूर येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात व्यवस्थापन समिती आणि प्रशासनाने परंपरेनुसार चालत आलेल्या तसेच भक्तांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या दैनंदिन किर्तन, भजन बंद केल्याने सर्वत्र रोष व्यक्त होत आहे. याचा निषेध पाथरी येथील भजनी मंडळांनी केला आहे.
शनिवारी, २४ सप्टेंबर रोजी तहसीलदार सुमन मोरे यांना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि पाथरी येथील भजन मंडळांनी याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की कारण काहीही असो परंतु सदरील विषय हा श्रद्धेचा आणि भक्तीभावाचा असल्याने मंदिर व्यवस्थापन समिती आणि प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे. पूर्वापार चालत आलेली परंपरा पूर्ववत करावी. सदरील अन्यायकारक जबरदस्तीने थोपवण्यात आलेल्या व्यवस्थापन प्रशासनाच्या नियमाचा मोठा निषेध नोंदविण्यात आला. निवेदनावर सुरेश बुवा महाराज , बळीराम महाराज शिंदे, संतोष गुरु केदारे, अशोक अमृतसागर, मारुती चिंचाणे, लक्ष्मण महाराज पुरी, संदीप मंगरूळकर, दिनकर चपाटे, सुजीत मुळे, दीपक गवारे, रुपेश मुळे, विश्वनाथ गायकवाड पाटील, बंडू भाऊ माने, भगवान पौळ, तुकाराम मानोलीकर, पद्माकर चौधरी, विश्वंभर गिराम आदींसह भाविकांच्या स्वाक्षर्या आहेत. मंदिर समितीने पूर्वपरंपरा जपत जशास तसे भजन-किर्तन चालू ठेवावे अन्यथा संस्थेद्वारे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.