प्रेरणादायी : पुरस्कार कार्याला बळ देतात
जयप्रकाशजी बिहाणी : ब्रह्माकुमारी विद्यालयात रामप्रसाद घोडके, बिहाणी, गिल्डा यांचा सत्कार
परभणी : पुरस्कार प्रोत्साहन देतात. जबाबदारीचे भान जागृत करतात आणि अधिक चांगल्या कार्यासाठी प्रेरणादायी बळ देतात, असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी यांनी केले.
सेलू येथील ब्रह्माकुमारी विद्यालयात गुरुवारी, २९ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या महेश भूषण पुरस्काराबद्दल उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी, परमवीर अब्दुल हमीद पुरस्काराचे मानकरी उद्योजक रामप्रसाद घोडके; तसेच माहेश्वरी सभेचा विशेष सेवा पुरस्कारप्राप्त सेलू महिला मंडळाच्या सचिव ललिता गिल्डा; तसेच किरण बिहाणी यांचा याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी सविता बहेनजी, किरण बिहाणी, इंजिनिअर बी.एस.कोलते आदींची उपस्थिती होती.
बिहाणी म्हणाले, स्वतःचे नियत काम निष्ठेने करून धर्मासाठी, समाजाकरिता योगदान देणे जीवनात महत्त्वपूर्ण आहे. ईश्वरीय ज्ञान ऐकणारा प्रत्येक व्यक्ती भाग्यवान आहे.”
सविता बहेनजी यांनी ब्रह्माकुमारी विद्यालयात राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. या वेळी ललिता गिल्डा, इंजिनिअर कोलते यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राधा बहेन यांनी केले.