राष्ट्रवादीचा महामोर्चा : मच्छिमारांच्या मागण्यांसाठी जिंतूर तहसील कार्यालयावर धडकला…
माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन, शेकडो मच्छिमारांचा मोठ्या संख्येने सहभाग
परभणी : जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयावर मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (तीन ऑक्टोबर) जिंतूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. कुटुंबियांसह शेकडो मच्छिमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
माजी आमदार विजय भांबळे यांनी मोर्चाला संबोधित केले. परप्रांतीय मच्छिमारांमार्फत मच्छिमारी करणारी संस्था ही नावाला असून, या संस्थेचे खरे सूत्रधार ह्या भाजपच्या विद्यमान आमदार व भाजपचे माजी आमदार आहेत. त्यांनी जिंतूर तालुक्यातील स्थानिक मच्छिमार यांना मासे पकडण्यास बंदी घातली असून, परप्रांतीय मच्छिमारांना मच्छिमारी करण्यास आयात केले आहे. स्थानिकच्या मच्छिमारांना गावरान मासे पकडण्याची देखील मुभा दिली जात नाही. त्यांना तळ्यावर दिसताच बेदम मारहाण करून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप भांबळे यांनी या वेळी केला. मच्छिमारांवर होणारे अन्याय तात्काळ न थांबवल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील मच्छिमारांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल असा इशारा भांबळे यांनी दिला.
या वेळी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तहसीलदारामार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयाचा ठेका स्व.राजीव गांधी मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित बामणी यांना सुटलेला असून, त्यांनी पी.पी.पी.करार करून महाराष्ट्र फिश कंपनीला भागीदार केलेले आहे. ही मच्छिमार संस्था व कंपनीचे सर्व भागीदार हे धनदांडगे असून, ते स्थानिकच्या गरीब मच्छिमारांवर सतत अन्याय अत्याचार करत आहेत. त्यांनी जलाशयाची निगराणी करण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे लोक नेमले असून, ते महिला व पुरुष मच्छिमारांना दिसताच बेदम मारहाण करत आहेत. जिंतूर व सेनगाव तालुक्यातील जलाशय नजीकच्या गावातील स्थानिकचे तीन हजार मच्छिमार असताना सदर कंपनीने परप्रांतीय मच्छिमार कामाला लावले आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छिमार बेरोजगार होत आहेत. मच्छिमारांनी वेळोवेळी निवेदने, आंदोलने करून देखील हा प्रश्न सुटला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
मच्छिमारांनी पकडलेले गावरान मासे कमिशन बेसवर देण्यात यावेत मच्छिमारांना स्व.राजीव गांधी मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्या.बामणी यांचे सभासद करून घेण्यात यावे. परप्रांतीय मच्छिमारांना मच्छिमार करण्यास बंदी घालण्यात यावी. झोरलीचे डाव चालू करण्याची परवानगी देण्यात यावी. संस्थेचे बोगस पदाधिकारी निलंबित करून सदर संस्था काळ्या यादीत टाकण्यात यावी. संस्था रजिष्ट्रेशनसाठी बोगस प्रमाणपत्र लावलेल्या सभासदांवर व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. बामणी, जिंतूर, चारठाणा, सेनगाव येथे दाखल असलेले मच्छिमारांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. बेकायदेशीर उभे करण्यात आलेले परप्रांतीयांचे शेड तात्काळ हटवण्यात यावेत, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदनावर माजी आमदार विजय भांबळे, प्रसाद बुधवंत, विश्वनाथ राठोड, बाळासाहेब घुगे, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, अभिनय राऊत, रवींद्र गडदे, मनोज थिटे, बाळासाहेब भांबळे आदीसह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. या वेळी प्रसादराव बुधवंत, विश्वनाथ राठोड, बाळासाहेब घुगे, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, अभिनय राऊत, रवींद्र गडदे, मनोज थिटे, बाळासाहेब भांबळे, गणेशराव इलग, शरद मस्के, मधुकर भवाळे, विजय खिस्ते, शरद अंभूरे, किरण दाभाडे, मुंजाभाऊ तळेकर, दिलीप डोईफोडे, बाबाराव ठोंबरे, मनोहर डोईफोडे, शाहेद बेग मिर्झा, शोएब जानिमिया, द्लमीर पठाण, संजय निकाळजे, चंद्रकांत बहिरट, सोहेल सर, आहेमद बागबान, शौकत लाला, मकसूद पठाण, आशाताई खिल्लारे, शंकर जाधव, खयुम कादरी, अविनाश मस्के, शाहेद सिद्दिकी, माधव घोगरे, किशन मानवते, मनोज खंदारे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मच्छिमार यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
…अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
संबंधित संस्थेने जिंतूर तालुक्यातील स्थानिक मच्छिमार यांना मासे पकडण्यास बंदी घातली असून, परप्रांतीय मच्छिमारांना मच्छिमारी करण्यास आयात केले आहे. स्थानिकच्या मच्छिमारांना गावरान मासे पकडण्याची देखील मुभा दिली जात नाही. त्यांना तळ्यावर दिसताच बेदम मारहाण करून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप भांबळे यांनी या वेळी केला. प्रशासनाने मच्छिमारांवर अन्याय करू नये. मच्छिमारांवर होणारे अन्याय तात्काळ न थांबवल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील मच्छिमारांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा भांबळे यांनी दिला.