असंतोषाचा मोर्चा : मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली परभणीत शिक्षकांचे जोरदार आंदोलन

असंतोषाचा मोर्चा : मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली परभणीत शिक्षकांचे जोरदार आंदोलन

असंतोषाचा मोर्चा : मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली परभणीत शिक्षकांचे जोरदार आंदोलन

घोषणाबाजीने परिसर दणाणला, मोठ्या संख्येने शिक्षकांचा सहभाग

परभणी : अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी, निकषप्रात्र शाळांना अनुदान मंजूर करून शिक्षकांची वेठबिगारी थांबवा यासह शिक्षण व शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी परभणी जिल्हा मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली रविवारी, ९ ऑक्टोबर रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा काढण्यात आला.
प्रलंबित प्रश्नांवरून निर्माण झालेल्या असंतोषाला, जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चेकऱ्यांनी वाट मोकळी करून दिली. या वेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.राज्य सरकारच्या धरसोडीच्या व नकारात्मक शैक्षणिक धोरणामुळे राज्यातील शिक्षण विभाग प्रश्नग्रस्त बनला आहे. राज्यकर्त्यांनी स्वतःसाठी आकर्षक पेन्शन योजना लागू करुन घेतलेली असताना, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिशय कुचकामी अशी अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. गेल्या वीस बावीस वर्षापासून हजारो शिक्षक शिक्षकेत्तर विनावेतन किंवा अल्पवेतनावर काम करीत आहेत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्न प्रलंबित असल्यामुळे सर्व घटकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. राज्यातील निकषपात्र विनाअनुदानित शाळा, वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रानुसार अनुदान देऊन शिक्षकांची वेठबिगारी संपवावी, राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० अशा तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, शिक्षक पाल्यांना विहित दराने अर्थसाहा करणारा १६ मार्च २०२१ चा शासन आदेश रद्द करुन सर्व स्तरावरील मोफत शिक्षणाचा शासन आदेश लागू करावा, सर्व शैक्षणिक संस्थांचे वेतनेत्तर अनुदान सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे आदी २३ मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
सकाळी अकरा वाजता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मराठवाडा शिक्षक संघाचे पी.एस.घाडगे, व्ही.जी.पवार, शिक्षक मतदार संघातील उमेदवार सूर्यकांत विश्वासराव, राजकुमार कदम, जी.डी.पोले, विक्रम कदम, आर एन. सूर्यवंशी, यु.आर.थोंबाळ, बी.टी. सांगळे, बी.एस.पूर्णे, एम.बी.जाधव, जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, एन.टी.कदम, पी.एस.जाधव, एन.एस.हाके, डी.के.देवकते, सीताराम साखरे, पी.डी.भरणे, के. एस. वसेकर , बी.एम.कांदे, बी.यु.फड आदींसह पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चात संस्थाचालक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!