Donate Blood : सेलूतील शिबिरात १०७ जणांचे रक्तदान
जमात-ए-इस्लामी हिंद युथ विंगचा उपक्रम, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सेलू,जि.परभणी : जगाला मानव सेवेचा संदेश देणारे प्रेषित मुहम्मद यांच्या मानव सेवेच्या उद्दिष्टाला समोर ठेवून रक्तदान – इबादत भी, जिन्दगी भी या अभियानाअंतर्गत सेलू येथे आयोजित शिबिरात १०७ जणांनी रक्तदान केले. युथ विंग जमात इस्लामी हिंदच्या वतीने रविवारी, ९ ऑक्टोबर रोजी राज्यभरात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सेलू येथे एसआयओ व महाराष्ट्र मेडिकल सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले. हाफेज मुसैब यांनी उद्घाटन करून कुराण पठण केले. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.मुजम्मील खान यांची उपस्थिती होती. यूथ विंग जमात ए इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. दरम्यान, राज्यभरात 37 ठिकाणी आयोजित शिबिरामध्ये 6427 जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले, अशी माहिती राज्य अध्यक्ष उमर खान यांनी दिली.