अक्षर व्याख्यानमाला : अमर हबीब यांचे बुधवारी व्याख्यान, कवी इंद्रजित भालेराव यांचा सत्कार
सेलूतील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम, आहेर बोरगावच्या शाळेत कार्यक्रम
सेलू जि.परभणी : भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम जयंती आणि वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून, शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्यावतीने, बुधवारी ( १९ ऑक्टोबर) किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या वेळी षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्ताने ख्यातनाम कवी इंद्रजित भालेराव यांचा सत्कार केला जाणार आहे.
आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक विद्यालयात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आहे. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर अध्यक्षस्थानी असतील. अक्षर व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्षे आहे. अमर हबीब हे ‘आता उठवू सारे रान ‘ या विषयावर पुष्प गुंफतील. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, गजानन वाघमारे उपस्थित राहणार आहेत. मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, सुरेश हिवाळे, शरद ठाकर, डॉ.अशोक पाठक, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, सुभाष मोहकरे, रमेश नखाते, एकनाथ जाधव, डॉ.सतीश मगर, शिक्षक व सदस्य परिश्रम घेत आहेत.