निम्न दुधना : विसर्ग घटला; सहा दरवाजे सुरू…
६०६० क्युसेक नदीपात्रात पाणी सुरू आहे.
परभणी : सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना सिंचन प्रकल्पाचे बारा दरवाजे टप्प्याटप्प्याने ०.३० मीटरने सोमवारी (१७ ऑक्टोबर) उघडण्यात आले. दुपारी तीन वाजल्यापासून वीस पैकी बारा दरवाज्यातून १२१२० क्युसेक दराने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता. दरम्यान, सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने सहा दरवाजे बंद करून विसर्ग घटविण्यात आला. रात्री दहा वाजल्यापासून सहा दरवाज्यातून ६०६० क्युसेक दराने नदीपात्रात पाणी सुरू आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन निम्न दुधना सिंचन प्रकल्प, पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.