एमआयडीसी : सेलूतील टेक्स्टाईल पार्कला मंजुरी : आमदार मेघना बोर्डीकर

एमआयडीसी : सेलूतील टेक्स्टाईल पार्कला मंजुरी : आमदार मेघना बोर्डीकर

पाहणीसाठी अधिकाऱ्यांचे पथक भेट देणार, 11 तारखेला व्यापक बैठक

सेलू (जि.परभणी) : येथील बऱ्याच वर्षापासून रेंगाळत पडलेला महत्वाकांक्षी एमआयडीसीच्या प्रश्नासह टेक्सटाईल पार्कचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. एमआयडीसी व  टेक्सटाईल पार्कला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शुक्रवारी (४ नोव्हेंबर) ही माहिती दिली.

गुरुवारी (३ नोव्हेंबर) सेलूतील एमआयडीसी संदर्भात मुंबई येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, उद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र काकुस्ते, मुख्य व्यवस्थापक (भूसंपादन ) संदीप आहेर, कदम, उपसचिव राहुल देशपांडे, अभिजीत पारवे, सुनील भोंबे, सेलूचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी आंचल गोयल बैठकीला उपस्थित होत्या. सेलू ‘एमआयडीसी’ला मूर्तरूप बैठकीत देण्यात आले. या वेळी आमदार बोर्डीकर यांनी सेलू शहरातील ‘एमआयडी व टेक्सटाईल पार्क’साठी आग्रही भूमिका घेतली. परिसरातील बाजारपेठेचे ठिकाण व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन, उद्योग मंत्री सामंत यांनी “ड्रायपोर्ट व लॉजिस्टिक पार्क” करिता सकारात्मक प्रतिसाद देत विभागास प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. सेलूची बाजारपेठ ही ‘कॉटन हब’ म्हणून प्रसिद्ध असून, प्रतिवर्षी जवळपास दोन हजार कोटींची उलाढाल होते. कापसावर येथेच प्रक्रिया झाल्यास या भागात औद्योगिक क्रांती होइल. ही खुणगाठ बांधूनच इथल्या ‘टेक्सटाईल क्षेत्रात’ गुंतवणुकीची तयारी असणाऱ्या प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सेलूत हा प्रकल्प होणे किती महत्वाचे आहे हे पटवून देण्यात यश आले. एमआयडीसी व टेक्सटाईल पार्कमुळे परभणी जिल्ह्यातील हजारो युवकांना हक्काचा रोजगार  मिळणार आहे, असे बोर्डीकर यांनी सांगितले. ११ नोव्हेंबरला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांचे एक पथक यासंदर्भात सेलू येथे भेट देणार असून, पाहणी करून संवाद साधणार आहे, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, सेलू शहर औद्योगिक क्षेत्रासाठी हादगाव खुर्द, रवळगाव व पिंप्रोळा शिवारातील २४५.८१ हेक्टर क्षेत्रावर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशासकीय अधिकारी व आमदार मेघना बोर्डीकर ह्या औद्योगिक वसाहत व टेक्सटाइल पार्कला सकारात्मक आहेत. मात्र, एकूण २१५ खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ ६५ खातेदारांनी भूसंपादनाला संमती दिली आहे. उर्वरित १५० खातेदारपैकी हादगाव खूर्द ५४, रवळगाव ६३, तर पिंप्रोळा येथील सर्वच ३३ खातेदार शेतकऱ्यांनी अद्यापही संमती दिली नाही. विशेष म्हणजे औद्योगिक वसाहतीसाठी पुढाकार घेणाऱ्या चार-दोन मंडळींकडूनच या खातेदारांची दिशाभूल होत असल्याचा आरोप केला जात आहे. ‘त्यांचे’ मन वळवण्याचा प्रयत्न करून प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे सांगितले जात आहे.

हेही वाचा : सेलूतील एमआयडीसी : इतरत्र हलविण्याच्या हालचालींना वेग ?

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!