गौरवास्पद : राज्यपालांच्या हस्ते २१ शिक्षक सन्मानित; दीपस्तंभ प्रतिष्ठानचा उपक्रम
राजभवनात शानदार सोहळा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर यांची उपस्थिती
.
सेलू जि.परभणी : परभणी जिल्ह्यातील; तसेच जिंतूर- सेलू विधानसभा मतदार संघातील एकवीस शिक्षकांना परभणीतील दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (१३ नोव्हेंबर) मुंबई येथे राजभवनात आयोजित एका विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कारांचा उपक्रम राबविला जातो. उपक्रमशील शिक्षक पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे.समारंभाला आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाज आणि देशाला मूल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची गरज असून या कार्यामध्ये सर्वांनी तत्पर राहून ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला कायम न्याय दिला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केले. आदर्श शिक्षकाकडे समाजाला दिशा देणारा, भविष्यातील गुणवंत विद्यार्थी घडवणारा म्हणून पाहिले जाते. समाज घडवण्यासाठी या शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव या निमित्ताने आपल्याला करता आला, याचा आनंद आहे, अशा भावना आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केल्या. समारंभाला पुरस्कारप्राप्त शिक्षक, त्यांचे स्नेही, दीपस्तंभ प्रतिष्ठान परिवार, शिक्षणप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
या वेळी पूर्णा : बळीराम कदम पालम : ज्ञानोबा पातळे, गंगाखेड : नामदेव वैद्य, सोनपेठ : संतोष दिवटे, मानवत : दशरथ मुंडे, भारत शहाणे, परभणी , सुरेश खरात, पाथरी, जिंतूर तालुका : संतोष सकनूर : कावी, रत्नमाला शेळके : गणपूर, अनिल बसुळे : बोर्डी, कैलास झाडे : येसेगा गोविंद कांदे : सोरजा, अब्दुल खलील अब्दुल सलीम : जिंतूर, सेलू तालुका : विकास कदम : देऊळगाव गात), सुधाकर (शहाजी) कटारे : तिडीपिंपळगाव, गंगा भानुदास भोरकडे : राव्हा, डिगांबर रोकडे : केमापूर, राजेश्वर बावणे ; म्हाळसापूर, अमोल श्रीखंडे : चिकलठाणा, मो.जुबेर मो.अनिस अन्सारी : वालूर) यांचा; तसेच प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश पात्र जिंतूर येथील शुभम रोहिदास शिंदे या विद्यार्थ्यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.