शेवटचा दिस गोड व्हावा : बळीराम महाराज कुटे यांचे सेलूत कीर्तन 

शेवटचा दिस गोड व्हावा : बळीराम महाराज कुटे यांचे सेलूत कीर्तन 

मारोतराव ढगे यांच्या स्मरणार्थ ढगे कुटुंबियाच्या वतीने कीर्तनाचे आयोजन

सेलू, जि.परभणी : मानवी जीवन क्षणभंगुर आहे; परंतु जन्म दाते आई वडील हेच खरे दैवत आहेत. मानवी जीवनात सेवा धर्म हा सर्व श्रेष्ठ धर्म असून, आ़ई वडीलांची सेवा हीच खरी मानवी जीवनातील ईश्वर सेवा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैवतासमान आई वडीलांची सेवा करावी, असे आशीर्वचन बळीराम महाराज कुटे बीडकर यांनी दिले. “याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा ” यातून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी मानवी जीवनाचे सार सांगितल्याचे कुटे महाराज म्हणाले.

मारोतराव ढगे यांच्या स्मरणार्थ विष्णू नगरमध्ये, पत्रकार राजेश ढगे व संतोष ढगे यांनी मंगळवारी, सहा डिसेंबर रोजी कीर्तनाचे आयोजन केले होते. कुटे महाराज म्हणाले, संसार रूपी भवसागराच्या माया, मोह, लोभ या लाटांतून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी, प्रत्येकाने अध्यात्मिक जीवनाचा अंगीकार केला पाहिजे. संताच्या संगतीत जीवन मार्गक्रमण करून जीवनात जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करावे. ते पुढे म्हणाले,  “मरावे परी कीर्ती रूपी उरावे “हा फार मोठा संस्कार ठेवा संतांनी आपल्या आचरण व सेवा कार्यातून समाजासमोर ठेवला आहे. भक्त पुंडलिक, श्रावण बाळ यांच्या सेवेचा आदर्श प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावा. भारतीय संस्कृती व संस्कार पुढील पिढीला द्यावे.

विणेकरी बळीराम महाराज ढगे, मृदंगाचार्य रामा शिंदे (शिराळा) अरूण घोडके,गायनाचार्य मारुती महाराज वाघ, चंद्रकांत नाना कदम, वरखेड येथील भजनी मंडळाचे गुलाब महाराज ढगे, रावसाहेब ढगे, दीपक निलकंठ, कचरू ढगे, मुरलीधर ढगे, रामप्रसाद ढगे, माऊली ढगे, साहेबराव ढगे, अनंत ढगे, तांदळे महाराज, परमेश्वर ढगे, रामेश्वर ढगे, सिध्देश्वर ताटे ,कारके महराज, महादेव घोडके, बालासाहेब घोडके ,जगदीश घोडके आदींनी कीर्तनसेवेत सहभाग घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!