निवडणूक : सेलू, पाथरीतील ग्रामपंचायतींचा मंगळवारी निकाल
सेलूतील अकरा, तर पाथरी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी झाले मतदान
परभणी : सेलू तालुक्यातील अकरा, तर पाथरी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी रविवारी, 18 डिसेंबर रोजी मतदान शांततेत पार प़डले. मंगळवारी, 20 डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. अवघ्या काही तासांत निकाल हाती येतील. निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
गावचा कारभारी कोण ?
पाथरी : अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर jराज्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतीचे मतदान रविवारी पार पडले. पाथरी तालुक्यातील महत्त्वाच्या सहा ग्रामपंचायतीचा समावेश होता. काही ठिकाणी ‘हमरीमतुरी’ सोडल्यास मतदान शांततेत पार पडले. जिल्हा अधीक्षक आर. रागसुधा यांनी पाथरीतील काही मतदान केंद्रावर भेटी दिल्या. पोलिसांनी आपला चोख बंदोबस्त ठेवला होता. गावाचा कारभारी कोण? याचा फैसला मंगळवारी होणार आहे. सहाही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांनी सहभाग घेत समाधानकारक मतदान केले. यामध्ये सर्वाधिक लोणी ग्रामपंचायत व थेट सरपंच पदासाठी ९०.१२ टक्के मतदान तर, ढालेगाव(८९.७५), जवळा झुटा( ८५.९०), मुदगल (८०.०८), खेडुळा (८६.१७), वडी (८५.४०) एवढे मतदान झाले आहे. अशाप्रकारे पाथरी तालुक्यातील महत्त्वाच्या सहा गावातील उमेदवारांचे व सरपंचांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून काय निकाल लागतो म्हणून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. परंतु त्यासाठी उद्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गुलाल कोणावर ?
सेलू : सेलू तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीसाठी रविवारी, १८ डिसेंबर रोजी सरासरी ८४.०८ टक्के मतदान झाले आहे.
दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७३.५७ टक्के मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची टक्केवारी अशी : म्हाळसापूर ९३.३६, डिग्रस जहांगीर ९०.९६, शिंदे टाकळी ८८.२७ माले टाकळी ९१.३८ टक्के, रवळगाव ७५.८३, गुगळी धामणगाव ८६.०२, डासाळा ७९.१०, राधे धामणगाव ८१.८१, बोरकिन्ही – नरसापूर ८८.०७, कुपटा ७६.११, तर राव्हा येथील मतदान केंद्रावर ९२.१५ टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीसाठीच्या ३६ मतदान केंद्रावर एकूण १८६४२ मतदारांपैकी पुरुष ८२११, तर महिला ७४६३ अशा एकूण १५६७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, थेट सरपंच पदाची निवडणूक झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत गाव पुढाऱ्यांचा चांगलाच कस लागला. अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली. मंगळवारी याचा फैसला आहे.