धनलक्ष्मी : महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे बुधवारी सेलूत उद्घाटन
माधवानंद महाराज, प्रेक्षा भांबळे, रामप्रसाद घोडके, यादव यांची उपस्थिती
सेलू जि.परभणी : सेलू शहर व परिसरातील अर्थ विश्वात भर घालणार्या धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा शुभारंभ बुधवारी, २१ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता होत आहे. उमरखेड येथील चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती पूज्य माधवानंद महाराज यांच्या हस्ते पतसंस्थेचे उद्घाटन आहे. या वेळी सेलू येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक माधवराव यादव, उद्योजक रामप्रसाद घोडके, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) कार्यालयाजवळ आयोजित या समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेच्या अध्यक्ष शिलाताई अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, पतसंस्थेच्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.
गेल्या दोन अडीच दशकांपासून शहर व ग्रामीण भागात महिला बचतगटांच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांच्या आर्थिक सबलीकरणावर भर दिला जात आहे. राष्ट्रीयकृत बँकांचा बचतगटांना आधार मिळतो. दरम्यानच्या काळात सामाजिक कार्यकर्त्या लता आरोळे यांनी शहरात जिजामाता महिला नागरी सहकारी बँक सुरू केली होती. मात्र, पुढे तिचे देवगिरी नागरी सहकारी बँकेत विलीनीकरण झाले.
गेल्या काही काळात सेलू शहरातील थोड्याफार सहकारी बॅंका, पतसंस्था डबघाईस निघाल्या असल्या, तरी माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या नेतृत्वाखाली साईबाबा नागरी सहकारी बँकेचा जिल्हाभरातील विस्तार आश्वासकरित्या सुरू आहे. जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी पतसंस्था, सेलू नागरी सहकारी पतसंस्था, महेश अर्बन, बुलडाणा, वाल्मिकी बॅंक आदींसह विविध स्थानिक व अन्य जिल्ह्यातील क्रेडिट सोसायट्यांनी शहराचे अर्थकारण समृद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर सुरू होत असलेली ‘धनलक्ष्मी’ पतसंस्था महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी निश्चितच लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : अंधश्रद्धा निर्मूलन समिती : विवेकी जीवनशैलीची चळवळ : डॉ. हमीद दाभोळकर
हेही वाचा : निवडणूक : सेलू, पाथरीतील ग्रामपंचायतींचा मंगळवारी निकाल