धाडसी शिक्षक : पंधरा चिमुकल्यांचे वाचविले प्राण
गॅस शेगडीने घेतला होता पेट; जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाणवाडीच्या अंगणवाडीत मोठी दुर्घटना टळली
परभणी, २१ डिसेंबर : अंगणवाडीतील गॅसच्या नळीने अचानक पेट घेतला असताना स्वतःचा जीवाची पर्वा न करता, शाळेकडे निघालेल्या एका शिक्षकाने प्रसंगावधान राखून समयसूचकता दाखवत १५ चिमुकल्यांचे जीव वाचविले. जिंतूर (जि.परभणी) तालुक्यातील गडदगव्हाणवाडी येथे घडली.
प्रवीण राठोड (शारदा उच्च माध्यमिक विद्यालय, आडगावबाजार) असे या धाडसी शिक्षकाचे नाव आहे.या बाबत माहिती अशी की, सोमवारी (१९ डिसेंबर) सकाळी नऊ साडे नऊच्या सुमारास गडदगव्हाणवाडी येथील सार्वजनिक विहीरीजवळील अंगणवाडीत नेहमीप्रमाणे अंगणवाडीताई जनाबाई राठोड व कमलबाई राठोड या चिमुकल्यांचा आहार शिजवत होत्या. अचानक गॅसच्या नळीने पेट घेतला आणि अंगणवाडीत सर्वत्र धूर पसरला. शेगडीनं पेट घेतला. यावेळी सिलिंडर देखील सुरु होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अघटित दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली. अंगणवाडीच्या बाहेर मोठा गर्दी जमली. अंगणवाडीताई जनाबाई व कमलबाई यांनी आपापल्यापरीने चिमुकल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होत्या. परंतु वाढत्या धुरामुळे त्या त्रस्त झाल्या. सिलिंडरच्या खोलीत जाण्याचे धाडस होत नव्हते. याच वेळी शारदा उच्च माध्यमिक विद्यालय आडगावबाजार येथील शिक्षक प्रवीण राठोड घरातून शाळेकडे निघाले होते. अंगणवाडीतून निघणारा धूर व आत अडकलेल्या चिमुकल्यांना पाहून शिक्षक प्रवीण राठोड यांनी क्षणाचाही वेळ न दवडता धाडसाने अंगणवाडीत प्रवेश केला. ओले पोते घेऊन जीथे पेटलेला गॅस आहे. तिथे झडप घेऊन सिलिंडरचा रेग्युलेटर बंद केला. पेटलेली गॅस शेगडी विझली आणि तिथे अडकलेल्या १५ चिमुकल्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. राठोड यांनी जीवाची पर्वा न करता धाडसाने विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढले व मोठी दुर्घटना टळली. प्रवीण राठोड धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रवीण राठोड हे आडगाव बाजार येथील शारदा उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. सकाळी नऊच्या सुमारास ते गडदगव्हाणवाडीतून शाळेत निघाले होते. जमलेली गर्दी पाहून ते अंगणवाडी जवळ थांबले. घटनेचे गांभीर्य ओळखून, जीवाची पर्वा न करता धाडसाने त्यांनी धूर निघत असलेल्या खोलीत प्रवेश करुन सिलिंडरचे रेग्युलेटर बंद केले. विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढले.यात राठोड यांच्या हाताला थोडा चटका बसला; परंतु मोठी दुर्घटना टळली. गावकऱ्यांनी व शाळेतील शिक्षकांनी प्रवीण राठोड धाडसाचे कौतुक केले.