‘श्री सम्मेद शिखरजी’ : पारसनाथ पर्वतराजचे पावित्र्य राखा; जैन समाजाचे प्रशासनाला साकडे
सेलूत दुकाने कडकडीत बंद ठेवून निषेध , विविध मागण्यांचे निवेदन
सेलू जि.परभणी : झारखंड राज्यातील गिरीडिह येथील श्री सम्मेद शिखरजी पारसनाथ पर्वतराज यांची स्वतंत्र ओळख, पावित्र्य आणि संरक्षणासाठी जागतिक जैन संघटनेतर्फे राष्ट्रव्यापी श्री सम्मेद शिखरजी बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याला पाठिंबा देत सेलू (जि.परभणी) येथील सकल जैन समाजातर्फे विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांना बुधवारी (२१ डिसेंबर) देण्यात आले. दरम्यान सकल जैन समाजातर्फे सेलू शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने कडकडीत बंद ठेवून निषेध पाळण्यात आला.
श्री सम्मेद शिखरजी पारसनाथ पर्वतराज हे वीस जैन तीर्थंकर आणि अनंत संतांचे मोक्षस्थान आहे. पारसनाथ पर्वतराज हे वन्यजीव अभयारण्य, पर्यावरण पर्यटनासाठी घोषित केलेल्या इको-सेन्सिटिव्ह झोन अंतर्गत विभागीय मास्टर प्लॅन आणि पर्यटन मास्टर प्लॅन, धार्मिक पर्यटन यादीतून वगळण्यात यावे. पर्वतराज संदर्भात दोन ऑगस्ट २०१९ ची जारी अधिसूचना रद्द करावी. हे पवित्र क्षेत्र मद्यविक्रीमुक्त घोषित करावे. पर्वतराजचा वंदना मार्ग अतिक्रमणमुक्त करावा. वाहन चालवणे व अखाद्य साहित्याची विक्री, प्रवाशांची नोंदणी, सीआरपीएफ आणि स्कॅनरसह दोन चेक पोस्ट, सामान तपासणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. बेकायदेशीर वृक्षतोड करणे, दगडांचे अवैध उत्खनन आणि महुआला आग लावण्यावर बंदी घालावी. आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. या वेळी निवेदक प्रेमचंद लोढा, नीलेश बिनायके, रोहित काला, रमेश काला, प्रफुल्ल बिनायके, ललित बिनायके, विशाल संघई, ईश्वर जैन,आंचलिया आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा : धाडसी शिक्षक : पंधरा चिमुकल्यांचे वाचविले प्राण
हेही वाचा : राष्ट्रवादी पुन्हा : सेलू,जिंतूरमध्ये सतरा ग्रामपंचायतीत घड्याळाचा गजर
हेही वाचा : जल्लोष : निकालानंतर विजयी उमेदवारांचा सेलूत आनंदोत्सव
हेही वाचा : करिष्मा कायम : रवळगावात डॉ.संजय रोडगेंचे चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व