स्नेहसंमेलन : शाळा देते आयुष्याला शिस्त : जयश्री काटकर यांचे प्रतिपादन
सेलूतील नूतन कन्या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात, विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

सेलू जि.परभणी : येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैय्यालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण शुक्रवारी, २० जानेवारी रोजी उत्साहात झाले. या वेळी बोलतांना प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित शेगावच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर म्हणाल्या, “ आयुष्याचे शिल्पकार खऱ्या अर्थाने गुरुजन असतात. ज्या शाळेत आपण शिकतो, ज्या गुरुजनांनी आपणास शिकविले, घडवले त्या गुरुजनांप्रती, त्या शाळेप्रती आपण सदैव कृतज्ञ, आदरार्थी असले पाहिजे. आयुष्याला एक प्रकारची नैतिक शिस्त शाळेमुळेच मिळते.”
अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे गुरूजी होते. चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, संस्था सदस्य दत्तराव पावडे, अजीजखान पठाण, राजेश गुप्ता, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, केंद्रप्रमुख सरदार, माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष माधुरी देशपांडे, मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक डी.बी.घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात डी.के.देशपांडे गुरूजी यांनी प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दत्तराव पावडे यांनी बक्षीस पात्र विद्यार्थिनींचे अभिनंदन करत अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. पाहुण्यांचा परिचय सतिश कुंडीकर यांनी दिला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता खराबे यांनी केले. अहवाल उपमुख्याध्यापक डी.बी.घोगरे यांनी सादर केला
पारितोषिक व प्रमाणपत्र वितरणाचे संचालन शशिकांत देशपांडे, कीर्ती राऊत, सुनील मोगल, सीमा सूक्ते, वैशाली चव्हाण, प्रकाश खराटे, किशोर विश्वामित्रे, किशोर ढोके, सुषमा दामा,सुरेखा आगळे यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली. स्वागत गीत पूजा महाजन व संच यांनी गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती राऊत, श्रावणी हेलसकर, अपर्णा पवार यांनी केले. भालचंद्र गांजापूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शंकर बोधनापोड, सुहास देऊळगावकर, अनंत बोराडे, नागेश देशमुख, बाबासाहेब थोरे, विनोद शिंदे, गोविंद शिंदे, श्रीकांत नेवरेकर, उपेंद्र दिवाळकर, रेणुका अंबेकर, विजया खडके, ज्योती कुंभकर्ण, सपना पाटणी, पंडित जाधव, कैलास मलवडे, यशवंत कुलकर्णी, शिवाजी शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
या वेळी प्रमुख पाहुण्या जयश्री काटकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षा तसेच स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थिनींचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवडलेल्या श्रावणी दत्तात्रय हेलसकर, गिरीजा अनिल कुलकर्णी, उत्कृष्ट खेळाडू इरा मोहन खापरखुंटीकर, भारती महेश शिंदे आणि कलारत्न अपर्णा गजानन पवार या विद्यार्थिनींचा विशेष सन्मान करण्यात आला. वर्ग सजावट स्पर्धेतील विजेत्यांचे खास अभिनंदन करण्यात आले.