राष्ट्रवादीचाच झेंडा उंच : औरंगाबाद शिक्षक मतदार संघात विक्रम काळेंचा विजयाचा ‘विक्रम’; सर्वत्र जल्लोष
आमदार विक्रम काळे सलग चौथ्यांदा विधानपरिषदेवर, मराठवाडा शिक्षक संघाचे अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांची जोरदार टक्कर, भाजपाचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव
Authored By Babasaheb Helaskar…
सेलू,जि.परभणी : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रसचे उमेदवार विक्रम काळे यांनी नाराजीच्या लाटेवर स्वार होत, चौथ्यांदा विजयश्री खेचून आणली आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विक्रम काळे यांना तेराव्या फेरी अखेर 23 हजार ५७७ मते मिळवून विजयी ठरले. या फेरीअखेरही कोणताही उमेदवार निर्धारित २५,३८६ मतांचा कोटा पूर्ण करू शकला नाही. किरण पाटलांना 16 हजार 643 मते मिळाली आहे. तर मराठवाडा शिक्षक संघाचे अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना १४,१२८ मते मिळाली. रात्री उशिरापर्यंत अधिकृत निकाल जाहीर झाला नव्हता. संपूर्ण मराठवाड्यासह राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून होते. अखेर औरंगाबाद शिक्षक मतदार संघात विक्रम काळेंने चौथ्यांदा विजयश्री मिळवून विजयी ‘विक्रम’ प्रस्थापित केला आहे.
गुरुवारी, दोन फेब्रुवारी सकाळी आठ वाजता मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती. विभागातील आठ जिलह्यातील एकूण ५३,२५७ मतदारांनी सोमवारी मतदान केले होते. एकूण ५६ टेबलावर मतमोजणी सुरू झाली. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला निर्धारित कोटा पूर्ण करता आला नाही. पहिल्या पसंतीची विक्रम काळे यांना तब्बल २०,०७८ मतं मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे किरण पाटील यांना १३,५७० मतांवर समाधान मानावं लागलं. २४८५ मते बाद ठरली. अकराव्या फेरीअखेर काळे यांना ६८३४ मतांची आघाडी होती. त्यांना २०,७८० मते, तर विश्वासराव यांना १३९४६ मते मिळाली होती.१३८८८ मते घेऊन पाटील तिसऱ्यास्थानी होते. निर्धारित मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने बाद ठरलेल्या पाटील यांची दुसऱ्या क्रमांकाची मते मोजण्यात आली. यात पाटील दुसऱ्या क्रमांकावर पोहचले, तर विश्वासराव तिसऱ्या. बाराव्या फेरीअखेर काळे यांना २१.१०२, पाटील यांना १४,१८२, तर विश्वासराव यांना १४१२८ मते मिळाली. मराठवाडा मतदारसंघातून तब्बल १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, खरी लढत महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये होती. त्यात काळे यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर प्रदीप सोळुंके यांना अवघी ४३५ मतं मिळाली. मराठवाडा शिक्षक संघाचे अपक्ष उमेदवार नांदेडचे सूर्यकांत संग्राम विश्वासराव या उमेदवाराने पहिल्या पसंतीची तब्बल १३,५४३ मतं घेत प्रस्थापितांचा आश्चर्याचा धक्का दिला. पहिल्या पसंतीच्या मतांत भाजपच्या अधिकृत उमेदवारापेक्षाही जास्त मतं विश्वासराव यांना मिळाली. कोटा पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतमोजणी करण्यात आली. दरम्यान, दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत विक्रम काळे यांना सर्वाधिक 23 हजार 580 मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला आहे.
विक्रम काळे यांचा चौथ्यांदा विजयचा ‘विक्रम’
मराठवाडा शिक्षक संघाचे वर्चस्व राहिलेल्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघात 2004 मध्ये आमदार विक्रम काळे यांचे वडिल राष्ट्रवादीचे वसंत काळे यांनी वर्चस्व प्रस्थापित करीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. दरम्यानच्या काळात वसंत काळे यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर विक्रम काळे 6 जानेवारी 2010 रोजी पहिल्यांदा निवडून आले. 5 डिसेंबर 2016 पर्यंत त्यांचा कालावधी राहिला. त्यानंतर 8 फेब्रुवारी 2017 मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी विजयश्री मिळविली. त्यानंतर 2017 ते 2022 पर्यंत ते तिसऱ्यांदा औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून विजयी होत मतदार संघावर पकड घट्ट केली. दरम्याच्या काळात काळे यांनी राष्ट्रवादी शिक्षक संघटना आणि पदवीधर संघटना मजबूत करण्यावर भर दिला. आता चौथ्यांदा औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा उंच करण्यात आमदार काळे यशस्वी झाले आहेत.
भाजपाच्या भक्कम मोर्चेबांधणीला अपयश
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला मराठवाडा शिक्षक मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाकडून देखील जोरदार केले. काँग्रेसमधून भाजपात आलेले किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.तळागाळातील शिक्षण क्षेत्राबाहेरील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भक्कम मोर्चे बांधणी केली. पण त्याचे यशात रूपांतर झाले आहे. किरण पाटील यांच्या प्रचारासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेतली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात बैठका घेतल्या. मात्र किरण पाटीलांच्या पदरी पराभवाची निराशा पडला.
मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांचा प्रस्थापितांना धक्का
यंदाच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सूर्यकांत विश्वासराव यांना मराठवाडा शिक्षक संघाने उमेदवारी दिली. सूर्यकांत विश्वासराव यांचा जन्म 1 जून 1964 रोजी कंधार तालुक्यातील धर्मापुरी येथे झाला. 1988 पासून त्यांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या कुरळा येथील शाळेत शिक्षकी नोकरी पत्करली. शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक अशी 35 वर्षे सेवा बजावल्यानंतर ते निवृत्त झाले. विश्वासराव हे 2003 ते 2008 या काळात मराठवाडा शिक्षक संघाचे कंधार तालुकाध्यक्ष, 2008 ते 2022 या काळात नांदेड जिल्हाध्यक्ष आणि 2022 मध्ये त्यांची मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या विश्वासराव यांनाच संघटनेने बिनविरोध उमेदवारी जाहीर केली. तर सूर्यकांत विश्वासराव गेली पंचावन्न वर्षे मराठवाड्यात कार्यरत आहे. 29 जानेवारी 1967 रोजी मराठवाडा शिक्षक संघाची स्थापना झाली. संघटनेचे जाळे मराठवाडाभर पसरलेल्या मराठवाडा शिक्षक संघाने यावेळच्या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी केली आणि ही संघटना ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना पहिल्या पसंतीची 13 हजार 543 मते मिळाली आहेत. यापूर्वी मराठवाडा शिक्षक संघाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळवला होता. डी.के.देशमुख, राजाभाऊ उदगीरकर, प.म.पाटील आणि पी.जी.दस्तूरकर हे मराठवाडा शिक्षक संघाचे आमदार होते. परंतु 2004 मध्ये राष्ट्रवादीचे वसंत काळे यांनी मराठवाडा शिक्षक संघाच्या विजयाची परंपरा खंडित केली आणि तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच ताब्यात राहिला होता. यंदा मात्र शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्षाचा शिरकाव नको, म्हणून मराठवाडा शिक्षक संघाने निवडणुकीच्या रिंगणात सर्व ताकद पणाला लावली. मात्र अखेर विजयश्री खेचून आणली ती राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनीच.
मविआकडून जल्लोष
दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर विक्रम काळे यांची आघाडी कायम होती. पुढे आघाडी मतांचा आकडा वाढत गेला. अंतिम टप्प्यात देखील काळे यांच्या मतांची आघाडी कायम होती. त्यामुळे अधिकृत निकालापूर्वीच महाविकास आघाडीकडून जल्लोष साजरा करण्याला सुरूवात झाली होती. काळे समर्थकांकडून गुलाल उधळत, आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी विक्रम काळे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
सेलूत मविआचा आनंदोत्सव
दरम्यान, आमदार विक्रम काळे विजयी झाल्याबद्दल ठिकठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. सेलू शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात आनंदोत्सव साजरा केला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, माऊली ताठे, सुधाकर रोकडे, रघुनाथ बागल, विनोद तरटे, अजय डासाळकर, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे भगवान देवकते, धनंजय भागवत, किशोर कटारे, तसेच लाला भाई, प्रदीप ढवळे, वाल्मिक खुळे, गौतम साळवे, गोटू धापसे, परवेज सौदागर, विशाल देशमुख, सचिन शिंदे, शिवाजी काळे, भरत रोडगे, नखाते सर, शाम मचाले, गाडेकर तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : अर्थसंकल्प : आर्थिक स्थिरता, संपन्नता देणारा : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर