मासिक पाळी : श्रद्धा असावी; अंधश्रद्धा नको : डॉ.आशा चांडक यांचे मत, सेलूत कार्यशाळा 

मासिक पाळी : श्रद्धा असावी; अंधश्रद्धा नको : डॉ.आशा चांडक यांचे मत, सेलूत कार्यशाळा 

सेलूतील महिला शिक्षकांसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा, एचएआरसी संस्था व गट साधन केंद्राचा उपक्रम

सेलू जि.परभणी : मासिक पाळी संदर्भात श्रद्धा असावी; पण अंधश्रद्धा बाळगू नये, असे मत समुपदेशक डॉ.आशा चांडक यांनी व्यक्त केले. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्था व शिक्षण विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदानित शाळेतील महिला शिक्षकांसाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन व स्त्रियांचे आरोग्य’ या विषयावर तालुकास्तरीय उद्बोधन कार्यशाळा सेलू येथील नूतन महाविद्यालयात सोमवारी, सहा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली. त्यावेळी डॉ.चांडक बोलत होत्या.

कार्यशाळेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी प्रा.उमेश राऊत यांनी केले. ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ विषयावर डॉ.आशा चांडक व डॉ.पवन चांडक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत तालुक्यातील महिला शिक्षिकांनी सहभाग घेतला. उमेश राऊत यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा विषयी माहिती देऊन शपथ दिली. डॉ.आशा चांडक यांनी मासिक पाळी बाबत माहिती देतांना, ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड, सुती कापडाच्या घड्याचा वापर, त्याची योग्य विल्हेवाट, पाळीत घ्यावयाचा योग्य पोषक आहार, सोबतच मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्यविषयक समस्या, पीसीओएस, अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय अर्थात शोषक म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले.  प्रास्ताविकात डॉ.पवन चांडक म्हणाले “एचएआरसी संस्थेतर्फे 3 जानेवारी 2019 पासून ते आजवर 95 ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. त्यातील 4 कार्यशाळा जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. परभणी, हिंगोली, वाशीम व बीड जिल्ह्यात 89 कार्यशाळेत 225 जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेतील 22 हजार पेक्षा अधिक किशोरवयीन मुलींचे समुपदेशन केले आहे.13 हजार पेक्षा अधिक किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप केले आहे. सर्व उपक्रम कोणतेही मानधन न घेता स्वःखर्चातून व लोकसहभागातून सुरू आहेत. या उपक्रमात आपापल्या परीने सहयोग दिल्यास मासिक पाळी व्यवस्थापन स्त्रियांच्या आयुष्यातील व्यापक आरोग्यपूर्ण चळवळ होईल.” सूत्रसंचालन श्रीमती काळे यांनी केले. या प्रसंगी प्रा.दयानंद जामगे, केंद्रप्रमुख सय्यद सरदार, गजानन भिते, शरद ठाकर, विजय चिकटे, डी.डी.रोकडे, गिरीश बोरगावकर, सुनीता काळे, श्रीमती पद्माकर, श्रीमती आमले, जनार्धन कदम आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा : राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धेत नूतन कन्या शाळेला प्रथम पारितोषिक 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!